भुसावळ तालुकास्तरीय शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धां उत्साह संपन्न ;

भुसावळ प्रतिनिधी : सेवा पंधरवाड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, नगरपरिषद भुसावळ आणि म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुकास्तरीय शालेय मुलींच्या खो-खो व मुलांच्या हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथे करण्यात आले. विविध शाळांमधील तब्बल ४४ संघांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बियाणी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मनोज बियाणी अध्यक्षस्थानी होते. नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी शेख परवेज यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संगीता बियाणी, वैभव पवार, म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने, बियाणी स्कूलचे प्राचार्य डी. एम. पाटील, मुख्याध्यापिका अपर्णा राजपूत, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे, विलास पाटील, हिम्मत पाटील यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
खो-खो स्पर्धेतील विजेते
मुलींच्या १४ वर्षे वयोगटात दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालय, सुनसगावचा संघ विजेता, तर महात्मा गांधी विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.
१७ वर्षे वयोगटात दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालयाचा संघ विजेता, तर माध्यमिक विद्यालय, ओझरखेडा संघाने उपविजेतेपद मिळविले.
१९ वर्षे वयोगटात गंगाधर सांडू चौधरी विद्यालयाचा संघ विजेता, तर महात्मा गांधी विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.
१९ वर्षे वयोगटातील अन्य सामन्यात महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव संघाने प्रथम, तर अलहिरा उर्दू स्कूल, भुसावळ संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
हॉलीबॉलमध्ये महात्मा गांधी विद्यालयाची बाजी
मुलांच्या १४ वर्षे वयोगटात ताप्ती पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर बियाणी पब्लिक स्कूल, भुसावळ संघ द्वितीय ठरला.
१७ वर्षे वयोगटात के. नारखेडे विद्यालयाने प्रथम, तर पंडित नेहरू विद्यालय, वराडसीम संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
१९ वर्षे वयोगटात महात्मा गांधी विद्यालयाचा संघ प्रथम, तर बियाणी पब्लिक स्कूलचा संघ द्वितीय ठरला.
क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून बजावली जबाबदारी
स्पर्धेतील पंच म्हणून डॉ. प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील, हिम्मत पाटील, विजय संकट, मुकेश मोरे, उमेश राठोड, नामदेव चव्हाण, निलेश राजपूत, दत्तू अहिरे, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी, योगेश खिर्डीकर, गणेश बोदडे, वंदना ठोके, अर्चना राजपूत आदी क्रीडा शिक्षकांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विविध वयोगटातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना मैदानावर चुरशीच्या लढती दिल्या. स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आले होते.