जळगाव (प्रतिनिधी ) - अहोरात्र देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावताना घरदारापासून दूर असलेल्या सैनिक बांधवांप्रती बंधुभाव व्यक्त करण्यासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही संस्थेच्या वतीने सैनिक बांधवांसाठी ५०० राख्या पाठविण्यात आल्या. या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या वेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश पाटील, कल्याण संघटक विश्वनाथ उगले तसेच वसतिगृह अधीक्षक समाधान धनगर उपस्थित होते. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने पाठविलेल्या या राख्या एस मराठा लाईट इन्फंट्री बटालियन, अरुणाचल प्रदेश तसेच अयोध्या, उत्तर प्रदेश येथे तैनात असलेल्या सैनिक बांधवांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. सीमेवर देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या मनगटावर जळगावच्या भगिनींच्या प्रेमाची राखी सजणार असून, या उपक्रमातून सैनिक-भगिनींच्या नात्याची भावनिक वीण अधिक घट्ट होणार आहे. या उपक्रमासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनिषा पाटील, आशा मौर्य, नूतन तासखेडकर, वंदना मंडावरे, किमया पाटील, रेणुका हिंगू, हर्षा गुजराती, तेजल वनरा, सुगन पाटील, मनोज कापले, रतिलाल महाजन आणि विनायक महाजन उपस्थित होते.


