ळभुसावळ,(प्रतिनिधी): भुसावळ शहरातील व्यापारी वर्गाला व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पालिकेने सन १९९५ ते २००० या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी तब्बल ३० व्यापारी संकुलांची उभारणी केली. या संकुलांमध्ये सुमारे १२६० गाळे असून, त्यामधून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या गाळ्यांमधून पालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळत असला तरी, त्याच व्यापारी संकुलांच्या देखभाल-दुरुस्तीकडे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. पालिकेच्या बहुतांश व्यापारी संकुलांची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. अनेक संकुलांमध्ये इमारतींची डागडुजी, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने व्यापारी आणि ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी असलेल्या सुविधांची नियमित देखभाल होत नसल्याने अस्वच्छतेचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही अनेक संकुलांमध्ये कायम आहे. छत्रपती शिवाजी महाराज संकुलात धोकादायक परिस्थिती जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील परिस्थिती याचे ठळक उदाहरण ठरत आहे. संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे तुकडे कोसळत असल्याने व्यापारी आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच विद्युत फिटिंगची अवस्थाही अत्यंत खराब असून, विद्युत तारा उघड्या अवस्थेत बाहेर लोंबकळताना दिसत आहेत. या उघड्या विद्युत तारांमुळे शॉर्टसर्किट किंवा अन्य दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला स्लॅबचे तुकडे कोसळत असून दुसऱ्या बाजूला धोकादायक विद्युत व्यवस्था असल्याने एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर व्यापारी संकुलांमध्ये नियमित स्वच्छता आणि देखभालीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संकुल परिसरातील मोकळ्या जागा तसेच सार्वजनिक वापराच्या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. पालिकेला या गाळ्यांमधून नियमित महसूल मिळत असताना, त्या तुलनेत व्यापारी संकुलांच्या देखभालीसाठी आवश्यक निधी व नियोजन केले जात नसल्याची नाराजी व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. ठराव झाले; प्रत्यक्ष कामांचे काय? व्यापारी संकुलांची डागडुजी व रंगरंगोटी करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून विविध ठराव करण्यात आले. मात्र, ठराव झाल्यानंतर प्रत्यक्षात कामे कितपत झाली, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या दोन दशकांपासून व्यापारी संकुलांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ठोसपणे मार्गी लागलेला नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. संकुलांच्या इमारती जुन्या झाल्याने अनेक ठिकाणी त्यांच्या संरचनात्मक स्थितीची तातडीने तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. धोकादायक भागांची त्वरित दुरुस्ती करणे, विद्युत व्यवस्था सुरक्षित करणे, रंगरंगोटी करणे आणि स्वच्छता व्यवस्था सुधारणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. नवीन संकुलांचाही अभाव; व्यापारीकरणावर परिणाम पालिकेच्या अनेक व्यापारी संकुलांची मुदत संपल्याची स्थिती असून, गाळेधारकांना पुढील मुदतवाढ देण्याबाबतही ठोस नियोजन आवश्यक आहे. एकीकडे जुन्या संकुलांची देखभाल होत नाही, तर दुसरीकडे शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवीन व्यापारी संकुलांची उभारणीही होत नसल्याने शहरातील व्यापारीकरणाला खीळ बसत असल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त जागा मिळणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अनेक गाळेधारकांना भविष्यात व्यवसाय सुरू ठेवण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. भुसावळ शहरातील जुन्या व्यापारी संकुलांची दुरवस्था, मूलभूत सुविधांचा अभाव आणि नवीन व्यापारी संकुलांची उभारणी न होणे याचा थेट परिणाम शहराच्या व्यापारी क्षेत्रावर होत आहे. सुविधा नसल्याने ग्राहकांची संख्या कमी होण्याची शक्यता असून, भविष्यात व्यापाऱ्यांवर इतर शहरांकडे स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. ठोस कृती आराखड्याची मागणी पालिकेने केवळ ठराव न करता प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून सर्व व्यापारी संकुलांचे सर्वेक्षण करावे, धोकादायक भागांची तातडीने दुरुस्ती करावी, विद्युत व्यवस्था सुरक्षित करावी तसेच स्वच्छता, पाणी, शौचालय आणि पार्किंगच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. भुसावळ पालिकेला १२६० गाळ्यांमधून नियमित महसूल मिळत असताना व्यापारी संकुलांच्या देखभालीसाठी ठोस पावले कधी उचलली जाणार आणि धोकादायक झालेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न कधी मार्गी लागणार, याकडे आता व्यापारी वर्गासह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


