भुसावळ (प्रतिनिधी )-येथील श्रीरामनगर भागात भुसावळ शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी छायाचित्रकारांच्या वतीने आंतरराष्ट्रीय छायाचित्र दिन अत्यंत उत्साहात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या स्नेहमेळाव्यात तंत्रज्ञानाची जोड देत एका विशेष डिजिटल ॲपचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात झाली. सर्वप्रथम कल्पना जावळे,दिपाली पाटील,आभा साळी, स्मिता राठोड आणि प्रिती नेवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छायाचित्रणाचा कणा असलेल्या आणि स्मृती जतन करणाऱ्या कॅमेराचे सर्व उपस्थितांनी मनोभावे पूजन केले. या प्रसंगी शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार नरसिंग राठोड,राजेंद्र जावळे,अविनाश साळी,श्याम गोविंदा, गणेश राठोड आणि मुकेश नेवे यांनी कॅमेरा पूजन करून कार्यक्रमाला आपली विशेष उपस्थिती लावली. फोटोग्राफी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानावर आणि जुन्या आठवणींवर या वेळी ज्येष्ठ दिग्गजांनी प्रकाश टाकला. लक्ष ॲपचे शानदार उद्घाटन: या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे युवा तंत्रज्ञ मीत अविनाश साळी याने फोटोग्राफी व इतर क्षेत्रासाठी विकसित केलेल्या विशेष लक्ष ॲपचे सादरीकरण. या डिजिटल ॲपचे अधिकृत उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र जावळे आणि श्याम गोविंदा यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. छायाचित्रकारांना व सर्व इतर व्यावसायिकांना आधुनिक युगात या ॲपचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश साळी यांनी केले,तर आभार गणेश राठोड यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि फोटोग्राफी क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो कॅप्शन - भुसावळ येथे ज्येष्ठ छायाचित्रकार तर्फे कॅमेरा पूजन करताना अविनाश साळी व श्याम गोविंदा व सोबत डावीकडून मुकेश नेवे,राजेंद्र जावळे,नरसिंग राठोड,दिपाली पाटील,कल्पना जावळे,स्मिता राठोड,आभा साळी,प्रिती नेवे दिसत आहे.


