भुसावळात वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. सत्येंद्र सिंह साधणार जनसंवाद ; देवगिरी कल्याण आश्रमातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ;

भुसावळ ( प्रतिनिधी )- 
‘वनवासी-ग्रामवासी-नगरवासी, आम्ही सर्व भारतवासी’ या भावनेतून कार्यरत असलेल्या देवगिरी कल्याण आश्रमातर्फे भुसावळ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. सत्येंद्र सिंह हे प्रवासादरम्यान भुसावळ येथे उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत 
शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शांतिनगर, भुसावळ येथील कमल गणपती हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते जनसंवाद साधणार असून मार्गदर्शन करणार आहे.
    अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना २६ डिसेंबर १९५२ रोजी छत्तीसगडमधील जशपूर नगर येथे स्व. श्रद्धेय रमाकांत केशव देशपांडे (बाळासाहेब देशपांडे) यांनी केली. वनवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, हितरक्षा, विकासकार्य, क्रीडा व कला आदी विविध क्षेत्रांत संस्थेच्या माध्यमातून सेवा कार्य केले जाते.
‘तू-मैं एक रक्त’ या भावनेतून ग्रामवासी, वनवासी आणि नगरवासी हे सर्व एकच समाजघटक आहेत, हा आपलेपणाचा भाव दृढ करणे हा आश्रमाच्या कार्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याचबरोबर वनवासी समाजाची प्राचीन संस्कृती व परंपरांचे जतन आणि संरक्षण करण्यासाठीही विविध उपक्रम राबविले जातात.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कल्याण आश्रमाच्या कार्याची ओळख करून देण्याबरोबरच वनवासी समाजासमोरील विविध प्रश्न, समस्या व अपेक्षा जाणून घेण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व वनवासी समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन देवगिरी कल्याण आश्रम, भुसावळ-जळगाव जिल्हा यांच्या वतीने  कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून  जिल्हाध्यक्ष डॉ. निलेश भिरुड (त्वचारोग तज्ज्ञ), सचिव प्रा. निलेश बेंडाळे, सहसचिव काशिनाथ बारेला सर,  यांनी केले आहे.