भुसावळ प्रतिनिधी -, (१७ ऑगस्ट २०२६)- ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६’ अंतर्गत ‘माझा गट, माझं कुटुंब’ या संकल्पनेवर आधारित शेतकरी गटांचे सामूहिक प्रशिक्षण वर्ग सुसरी, ता. भुसावळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महिला शेतकरी हातात तिरंगा ध्वज घेऊन प्रशिक्षणात सहभागी झाल्या. गटशेतीचा प्रचार व जनजागृती करण्यासाठी सुसरी गावातून महिला शेतकऱ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. हातात तिरंगा, SOPचे फलक आणि देशभक्तीच्या उत्साहामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना स्मार्ट शेती ॲप कसे भरायचे, त्यामध्ये आवश्यक माहिती कशी नोंदवायची, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गटातील एकी, परस्पर सहकार्य आणि सामूहिक ताकदीचे महत्त्व पटवून देण्यासाठी गटागटांमध्ये विशेष खेळ घेण्यात आला. या उपक्रमातून ‘एकीमध्येच खरी ताकद आहे’ हा संदेश महिलांनी प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात केला. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक महिला शेतकरी आपला डबा सोबत घेऊन आली होती. प्रशिक्षणानंतर सर्व महिलांनी एकत्र बसून आपापल्या डब्यातील जेवण एकमेकींसोबत वाटून घेत स्नेहभोजनाचा आनंद लुटला. प्रत्येकाच्या डब्यातील पदार्थ वेगवेगळे असले, तरी त्यामागील मायेची चव आणि आपुलकी मात्र एकच होती. तिरंग्याच्या साक्षीने, ज्ञानाच्या देवाणघेवाणीतून, खेळातील एकीतून आणि सामूहिक स्नेहभोजनातून ‘माझा गट, माझं कुटुंब’ ही संकल्पना केवळ सांगितली नाही, तर प्रत्यक्ष अनुभवली गेली. मातीशी जोडलेली ही माणसं आता एकमेकींच्या मनाशीही जोडली गेली आहेत. त्यामुळे ‘माझा गट, माझं कुटुंब’ ही केवळ एका दिवसाची आठवण न राहता, शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीसमोर एकत्र उभे राहण्याची नवी सुरुवात ठरली आहे. या कार्यक्रमास कृषी विभागाच्या मेंटॉर संगिता पाटील, पाणी फाऊंडेशनच्या फिल्ड ऑफिसर प्रियंका बैसाणे, जावेद गाडीवाले, उमेद मेंटॉर श्री. राहुल ठोसरे आणि प्रियंका पाटील यांची उपस्थिती होती.


