भुसावळमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त दावते इस्लामीची तिरंगा रॅली ; विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन दिला देशप्रेम व शांततेचा संदेश :

भुसावळ (प्रतिनिधी )- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दावते इस्लामी हिंदच्या वतीने भुसावळ शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन उत्साहाने सहभाग घेतला. देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला.

ही तिरंगा रॅली अमरदीप चौक येथून सुरू झाली. त्यानंतर रॅली रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, मॉडर्न रोड, जाम मोहल्ला आणि खडका रोड मार्गे रझा टॉवरजवळ पोहोचली. रॅलीदरम्यान शहरात देशभक्तीचे आणि राष्ट्रीय एकतेचे वातावरण निर्माण झाले.

रॅलीच्या समारोपप्रसंगी भारत देशात अमन-शांती, बंधुभाव तसेच देशाची प्रगती व समृद्धी यासाठी विशेष दुआ करण्यात आली.

रॅली यशस्वी करण्यासाठी हाफिज बिलाल, हाफिज कासिम, कारी इद्रीस, कारी दानिश, आसिफ अत्तारी, दानिश कुरेशी, जावेद मदीना, मोईन शेख, शोएब अत्तारी यांच्यासह दावते इस्लामी जळगाव जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी यांनी विशेष प्रयत्न केले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या तिरंगा रॅलीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याची भावना अधिक दृढ करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले.