पाचोरा तालुक्यात भीषण अपघात: दोन महिलांचा मृत्यू;

पाचोरा (प्रतिनिधी ): पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाजवळ चारचाकीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय भावी वधूसह 42 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 29 रोजी पहाटे झाला. या अपघातामुळे अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.

विवाहाची पत्रिका ठेवून परतताना अपघात

अमरावती जिल्ह्यातील हरम (ता. अचलपूर) येथील शिखा विनायक बेलसरे या तरुणीचा साखरपुडा झाल्यानंतर 8 मे रोजी होणाऱ्या लग्नासाठी शिखासह शुभम बेलसरे, सुनील मानकर, शिखा बेलसरे आणि. मीनाबाई मानकर (42) आदी विवाहाची पत्रिका सप्तश्रृंगी मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी वणी गडावर गेले होते. दर्शन घेऊन बुधवार, 9 एप्रिलच्या पहाटे ते चारचाकीने गावी परतत असताना सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास बांबरुड महादेवाजवळ अचानक वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला व कार झाडावर आदळली. या अपघातात मीना मानकर (42) यांचा जागीच मृत्यू झाला तर विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या शिका बेलसरे (22) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मयत तरुणीचा मीना या वहिनी असल्याचे सांगण्यात आले तर अपघातात त्यांचे दोन्ही भाऊ जखमी झाल्याची माहिती मिळाली

जखमींना मदतीसाठी सरपंच धावले

अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलीस, जय मल्हार रुग्णवाहिका चालक बबलू मराठे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. यावेळी नाशिककडे जात असलेले गोराडखेडा येथील सरपंच मनोज (आप्पा) पाटील यांनीही थांबून जखमींना मदत केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.