भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप.

यावल (प्रतिनिधी)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात अत्याचारग्रस्त कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.

जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार आणि आदिवासी विकास विभागाच्या निर्देशांनुसार, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत पीडित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी ‘गट-ड’ संवर्गात या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत दोन उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. श्री. नारायण रामसिंग ठाकरे यांची ‘चौकीदार’ पदावर शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वाघझिरा येथे नियुक्ती करण्यात आली. तसेच सागर लहु मोरे यांची ‘चौकीदार’ पदावर आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, चोपडा येथे नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, अत्याचारग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्राधान्य असून डॉ. आंबेडकर जयंतीदिनी दिलेले हे नियुक्तीपत्र त्यांना खरी आदरांजली आहे.

या कार्यक्रमास महापौर दीपमाला काळे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग योगेश पाटील, प्रशांत माहुरे तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.