भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ जंक्शन येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) एका सतर्क जवानाच्या धाडसी आणि वेळेवर केलेल्या प्रसंगावधान दाखवून केलेल्या कृतीने एका प्रवाशाचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे–जम्मूतवी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11077) सुटण्याच्या तयारीत असताना एका प्रवाशाने चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल जाऊन तो प्रवासी असंतुलित झाला आणि गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली.
यावेळी भुसावळ रेल्वे स्थानकावर तैनात असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे प्रधान आरक्षक एस. एस. खेडेकर यांनी प्रसंगावधान राखत त्वरित धाव घेतली. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता त्या प्रवाशाला खेचून सुरक्षित अंतरावर आणले आणि मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या धाडसामुळे संबंधित प्रवाशाचे प्राण वाचले.
या घटनेने चालत्या गाडीत चढणे किंवा उतरणे किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव पुन्हा एकदा करून दिली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्पष्ट आवाहन केले आहे की, गाडी पूर्णपणे थांबल्यानंतरच चढावे किंवा उतरावे.
रेल्वे सुरक्षा बल “ऑपरेशन जीवन रक्षा” अंतर्गत अशा प्रकारच्या घटनांमध्ये वेळेवर हस्तक्षेप करून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवत आहे. भुसावळ येथील ही घटना RPF च्या सतर्कता, कर्तव्यदक्षता आणि मानवतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.


