भुसावळमध्ये गावठी पिस्तुलसह तरुण ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील अवैध शस्त्रधारकांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करत गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली.

महेश्वर रेड्डी, अशोक नखाते आणि केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, श्रीराम नगर परिसरातील श्रीराम मंदिराजवळ एक तरुण गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तुल घेऊन फिरत होता. त्यानुसार डी. बी. पथकाने सापळा रचून संशयित संदीप सुनील जाधव (वय 23, रा. नाशिक) याला ताब्यात घेतले.

राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 20,000 रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल (मॅगझीनसह) आणि 1,000 रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 162/2026 नोंदवून आर्म्स अॅक्ट कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास विजय बळिराम नेरकर करीत आहेत.