फेकरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत; प्रथमच महिला अध्यक्षांची निवड, सर्वत्र कौतुक


दिपनगर (प्रतिनिधी ) – फेकरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दिनांक १६ रोजी बैठक घेऊन जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशांत निकम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राहुल वाघ तसेच कौतिक वाघोदे उपस्थित होते. प्रारंभी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी निवडताना यंदा महिलांना प्राधान्य देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता विविध क्षेत्रांत आपली छाप पाडली आहे, याची दखल घेत प्रथमच महिला अध्यक्षांची निवड करण्यात आली. वार्डातील ज्येष्ठ व सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या सोनाबाई सोमा निकम यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली.
उपाध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य जयश्री संजय वाघ, ज्योती जीवन सुरवाडे, अरुणा संजय दाभाडे आणि कल्पना बोदडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी मनोरमा अरुण निकम तर खजिनदारपदी सेवानिवृत्त पोस्टमास्तर जिजाबाई भागवत अडकमोल यांची निवड झाली.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोनाबाई निकम यांनी सांगितले की, यावर्षीची जयंती मिरवणूक सर्व समाजघटकांना सोबत घेऊन आगळीवेगळी व दिशादर्शक ठरेल. विविध पंचरंगी कार्यक्रमांद्वारे मनोरंजनासोबतच सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
बैठकीस वार्डातील धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला अध्यक्ष निवडीमुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.