अमळनेरमध्ये पहिल्यांदाच ‘आखाजी महोत्सव’; खान्देशी संस्कृतीचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल

अमळनेर – येथे यंदा प्रथमच ‘आखाजी महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अक्षय तृतीया निमित्ताने साजरा होणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन खान्देश साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे. ‘अहिराणी वाङ्मय दिन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधत खान्देशी परंपरा, भाषा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा हा व्यापक प्रयत्न ठरणार आहे.

महोत्सव दि. 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता एलआयसी कॉलनी परिसरातील खुल्या मैदानावर रंगणार असून, पारंपरिक सजावट आणि ग्रामीण वातावरणाची विशेष मांडणी करण्यात येणार आहे. खान्देशातील लोकजीवन, रूढी-परंपरा आणि विशेषतः अहिराणी भाषेचे संवर्धन यावर या उपक्रमातून भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी राहणार असून, उद्घाटन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते होणार आहे.

महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक स्पर्धा. खापरावर पुरणपोळी बनविणे, अहिराणी गीते, गौराईची गाणी आणि जात्यावरील गाण्यांच्या स्पर्धांमुळे ग्रामीण संस्कृतीचा अनुभव मिळणार आहे. याशिवाय पारंपरिक वेशभूषा आणि ‘एक मिनिटात उखाणे’ अशा स्पर्धांमधून महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी 5 हजार, द्वितीयसाठी 3 हजार आणि तृतीयसाठी 2 हजार रुपये तसेच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ‘गौराई’ सन्मानचिन्हाने विजेत्यांचा गौरव करण्यात येईल.

तसेच ‘अहिराणी शब्द व संस्कृती’ या विषयावर चालता-बोलता प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये मातृभाषा आणि सांस्कृतिक वारशाबाबत जागरूकता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.