भुसावळ, (प्रतिनिधी) –

शहरात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. याच. अनुषंगाने डीजे बंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलीस अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार रात्री १० नंतर डीजे व मोठ्या आवाजातील वाद्ये वाजविण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा
प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता हद्दपार तसेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा) अंतर्गत कठोर कारवाईचा नवा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. भुसावळ शहर पोलीस ठाणे व बाजारपेठ पोलीस
ठाण्याच्या हद्दीतील सराईत व वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात येणार असून १५ जणांवर हद्दपार व एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू आहे. या कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांची नावे निश्चित करण्यात आली आहेत व त्यांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.
तथापि, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तथापि, डीजे बंदी, प्रतिबंधात्मक कारवाई तसेच हद्दपार व एमपीडीए प्रस्तावांमुळे शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास डीवायएसपी केदार बारबोले यांनी व्यक्त केला आहे.
कारवाईसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती
शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची कुंडली तयार करा, त्यांच्यावरील गुन्हयांनुसार काही जणांवर हद्दपारीची तर काही जणांविरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आल्यामुळे आठवडाभरात हद्दपार आणि एमपीडीएचे प्रस्ताव शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यातून तयार होऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील नावे काढण्याचे काम क्राइम विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, कायदा मोडणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, कायदा मोठा आहे, त्यामुळे जो कोणी कायदा हातात घेईल, त्याला कायद्याने उत्तर देण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांपासून तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपद्रवी, दादागिरी, कायदा हातात घेणाऱ्यांवर भडक कारवाई करणार असल्याचे उपअधीक्षक केदार बारबोले यांनी सांगितले.


