अल्पवयीन मुलीवर सुरतमध्ये अत्याचार ; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी) – सोबत फिरायला चल, असे सांगून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरत येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुल रमेश राठोड (वय २५, रा. पिंप्राळा, जळगाव) याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी यांचे नातेवाईक संबंध आहेत. आरोपीने २९ जानेवारी रोजी फिरायला जाण्याच्या बहाण्याने मुलीला सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले. त्याठिकाणी ३० जानेवारी रोजी रात्री आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेची कुणाला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर पीडित मुलगी जळगावात परतल्यानंतर तिने ३ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते करीत आहेत.