राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्या दिवशी सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतदान होणाऱ्या १२ जिल्ह्यांतील ग्रामीण भागात सलग तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सरकारने दिला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी मतदान, तर सोमवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळेच मतदानाच्या दिवशी सार्वजनिक व्यवस्थेवर ताण येऊ नये, तसेच मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान, खासगी उद्योग, कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश उद्योग, कामगार आणि खाण विभागाने दिले आहेत. १८ वर्षांवरील सर्व नोंदणीकृत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मालकांनी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हा निर्णय कारखाने, खासगी कंपन्या, दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, भोजनालये, थिएटर, आयटी कंपन्या, मॉल्स आणि रिटेल आउटलेट्स यांना लागू राहणार आहे. मतदान असलेल्या जिल्ह्यांतील मतदार जर अन्य ठिकाणी कार्यरत असतील, तरी त्यांना सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज रात्री १० वाजता थांबणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी मतदान होणार असून, जिल्हा परिषदेसाठी २९९ तर पंचायत समितीसाठी ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचारावर काहीसा परिणाम झाला असला, तरी बहुतांश ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून निवडणूक चुरशीची ठरण्याचे संकेत आहेत.


