संतोषी माता सभागृह सील; नगरपरिषदेच्या कार्यालय स्थलांतराचा मार्ग मोकळा

भुसावळ ( प्रतिनिधी) –

भुसावळ शहरातील प्रोफेसर कॉलनीच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या संतोषी माता बहुद्देशीय सभागृहाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. शासन मान्यता नसताना नगरपालिकेकडून शैक्षणिक उद्देशाने वापरासाठी हे सभागृह देण्यात आले होते. या मूळ उद्देशाच्या विरोधात वापर तसेच शासन मान्यता नसताना झालेल्या हस्तांतरणासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने सभागृहाच्या विद्यमान ताबेधारकांकडून ताबा काढून ते सील करून भुसावळ नगरपालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपविभागीय अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे अधिकार दिले होते.

त्या अनुषंगाने आज उपविभागीय अधिकारी, भुसावळ जितेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष सभागृहाचा ताबा घेतला आहे. सदरील सभागृह भुसावळ नगरपालिकेच्या ताब्यात देण्याची अधिकृत प्रक्रिया याच आठवड्यात पूर्ण केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या सभागृहात नगरपरिषदेचे कार्यालय स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात या विषयावर जोरदार चर्चा होत असून, शहराच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नगरपरिषदेच्या अधिकृत सूत्रांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.