१२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपी अटकेत :

भुसावळ ( प्रतिनिधी) – वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी सुरेश जयराम मोरे या संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील एका भागात पीडित १२ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. २६ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी व तिची ९ वर्षांची लहान बहीण घरी एकट्याच असताना आरोपीने घरात प्रवेश करून पीडित मुलीशी अनुचित वर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच ही घटना कोणालाही सांगू नये, अन्यथा जीवे मारेल अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानंतर २८ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी शाळेत जात असताना सम्राट नगर परिसरात आरोपीने तिचा रस्ता अडवून जबरदस्तीने तिला आपल्या घराकडे नेण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी करत आहेत.