ज्येष्ठ नागरिकांनी सकस आहार व नियमित व्यायामावर भर द्यावा – रजनी सावकारे

.

भुसावळ (प्रतिनिधी) – आयुष्य हे अनमोल असून निरोगी शरीर, निरोगी मन व सकारात्मक विचारांसाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. शरीराची योग्य ती काळजी घेतली, तर आयुष्याची शंभरी गाठणे कठीण नाही, असे प्रतिपादन प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे यांनी केले.

ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सभासदांसाठी ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख, वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयोजक डॉ. नीतू पाटील, डॉ. तेजस राणा, डॉ. राहुल गवळी, अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ रजनी सावकारे म्हणाल्या की, वयानुसार आहारात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असून अशा आरोग्य शिबिरांमुळे आजारांचे वेळीच निदान होते.

या आरोग्य तपासणी शिबिराचा एकूण ५१ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस कोटेशन, डॉ. श्री. विक्रांत सोनार, डॉ. राहुल गवळी, शोभा सोनवणे, प्रणिता पाथरवट, औषध विभाग अधिकारी बाविस्कर तसेच मनोज सावकारे, अजीम शेख, रुपेश शेळके, चेतन भालेराव आदी उपस्थित होते