सकल लेवा महिला मंडळाचा हळदीकुंकू सोहळा वैचारिक वाणासह उत्साहात संपन्न ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – सकल लेवा महिला मंडळाच्या वतीने प्रभाकर हॉल येथे आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे तसेच नुकत्याच निवडून आलेल्या भुसावळच्या नगरसेविका प्रमुख उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकल लेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील होत्या. यावेळी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना हळदीकुंकूचे वाण देण्यात आले. याचप्रमाणे उपस्थित इतर नगरसेविकांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात समुपदेशक आरती चौधरी यांनी “मन फुलू द्या” या विषयावर मार्गदर्शन करत महिलांना आनंदी, सकारात्मक व समतोल जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले. तसेच वर्षा पाटील यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

सकल लेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण व सक्षम नेतृत्वामुळे हा उपक्रम केवळ परंपरागत न राहता समाजप्रबोधनाचा प्रभावी मंच ठरला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक विचारांचे वैचारिक वाण देणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

या कार्यक्रमाला प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा लोखंडे यांनी केले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रभाताई पाटील, सचिव राजश्री कोलते, खजिनदार स्वाती भोळे यांच्यासह मृणाल पाटील, कावेरी चौधरी, वैशाली धांडे, कल्पना शिंदे, वैशाली पाटील, मेघा कुरकुरे, वैशाली चौधरी, संध्या भोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.