भुसावळ (प्रतिनिधी )-

धार्मिक स्थळांच्या नावाखाली वीजेचा गैरवापर होत असल्याचे प्रकार समोर येत असतानाच, भुसावळ शहरात गजानन महाराज मंदिरातून बेकायदेशीरपणे वीज खेचून तिचा व्यावसायिक व घरगुती वापर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप होत असून, वारंवार तक्रार करूनही महावितरण व प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
श्रद्धा नगर परिसरातील माऊली प्लाझा येथे वास्तव्यास असलेले प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी या प्रकरणाची तक्रार केली आहे. त्यांच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी रवींद्र वामन तळेले यांच्या मालकीच्या घरात अनधिकृत वीज वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या फ्लॅटलगतच गजानन महाराज मंदिरातून आलेली वीजवाहिनी गेली असून, त्याच वायरद्वारे खालील प्लॉटमध्ये मोठ्या मशिनरी चालवून व्यावसायिक वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वरील मजल्यावर घरगुती वापरही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण व इतर पुरावे तक्रारदाराकडे उपलब्ध असल्याची माहिती प्रमोद पाटील यांनी दिली आहे.
प्रशासनावर गंभीर आरोप – ‘पाणी कुठेतरी मुरतंय?’
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, याबाबत संबंधित अधिकारी श्री. कवटे यांच्याकडे यापूर्वीच पुराव्यानिशी तक्रार करण्यात आली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
“पुरावे देऊनही प्रशासन गप्प का आहे? यामागे साटेलोटे आहे का?” असा थेट सवाल पाटील यांनी उपस्थित केला असून, या प्रकरणात ‘पाणी कुठेतरी मुरत असल्याचा’ संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
तक्रारदाराचा इशारा
“जर स्थानिक पातळीवर तात्काळ दंडात्मक कारवाई झाली नाही, तर वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागावी लागेल,” असा इशाराही प्रमोद पाटील यांनी दिला आहे.
मंदिराच्या पवित्र नावाचा वापर करून वीज चोरी करणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


