जळगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यात १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार रविरवारी दि. ३० रात्री थंडावणार आहे. दि. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मदतदानासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाभरातील १८ ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या ४६४ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी एकूण ९७७मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पालिका निवडणुकीची रणधुमाळी रविवारी रात्री थंडावणार आहे. गेल्या महिनाभरात प्रचार, आरोप-प्रत्यारोप तसेच उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्या गाठीभेटीने शहरी प्रभाग ढवळून निघाले आहेत. एकीकडे राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांकडून मतदान करून घेण्यासाठी जय्यत तयारीकरण्यात आलेली असताना दुसरीकडे मंगळवारी दि. २ होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसह दुसऱ्याच दिवशी दि. ३ डिसेंबरच्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक ती सर्व तयारी निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे.
जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी १५५५, तर नगराध्यक्षपदासाठी ७७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक उमेदवार भुसावळ व वरणगाव (प्रत्येकी ८) असून, मुक्ताईनगर व पाचोरा येथे सरळ लढत होणार आहे. निवडणुकीत भुसावळ ही ‘अ’ वर्ग नगरपरिषद, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर आणि पाचोरा या ‘ब’ वर्ग नगरपरिषद, तर यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, सावदा, रावेर, एरंडोल आणि फैजपूर, या ‘क’ वर्ग नगरपरिषद आहेत. शेंदूर्णी आणि मुक्ताईनगर या दोन नगरपंचायती आहेत. जिल्ह्यात ४६४ सदस्य पदांसाठी निवडणूक होणार असून, एकूण प्रभागांची संख्या २४६ आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रियेकरता आवश्यक मतदान केंद्राची निवड, तेथील व्यवस्था, अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक अशा सर्व प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे


