पालिका निवडणुकीतील उमेदवारांना दिलासा : मतदानाच्या आदल्या दिवशी 1 रोजी रात्री 10 पर्यंत करता येणार प्रचार –

मुंबई – राज्यातील पालिका निवडणुकांमधील इच्छूक उमेदवारांना अत्यंत दिलासा व देणारी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला होणार्‍या मतदानापूर्वी म्हणजेच 1 डिसेंबरपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करण्याची मुभा दिली आहे व त्याबाबत आदेशही जारी केले आहेत. नव्या आदेशाने उमेदवारांना मतदारापर्यंत आपला संदेश पोहोचवण्याची अधिक संधी मिळाली आहे.

यापूर्वीच्या नियमांनुसार मतदानाच्या दिवशी आणि त्याआधीच्या 24 तासांमध्ये सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच निवडणूक जाहिरात प्रसारणावर पूर्ण निर्बंध असायचे. परंतु, नव्या आदेशानुसार ही वेळ थोडी पुढे नेण्यात आली असून, उमेदवारांना मतदानाच्या आधल्या दिवशी ( 1 डिसेंबर) रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा राहणार आहे.

राज्यातील 3 प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित
राज्यातील तीन प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला मात्र अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक चिन्ह वाटप आणि प्रचार अंतिम टप्प्यात असून, अनेक प्रभागांमध्ये रणधुमाळी सुरू आहे. मात्र तीन ठिकाणी निवडणूक स्थगित झाल्याने काही प्रभागातील प्रक्रिया बाधित झाली आहे.

या उमेदवारांचा झाला मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवार नितीन वाघमारे यांचा निधन झाल्यामुळे येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भातील निवडणूक आयोगाचे अधिकृत पत्र जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त झाले आहे.

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर प्रभाग क्रमांक 2 मध्ये कुसुमबाई पाथरे यांचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे ही निवडणूक स्थगित झाली आहे. भाजपच्या उमेदवार असलेल्या पाथरे यांच्या निधनाने प्रभागातील निवडणुकीला ब्रेक लागला आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये दूरदानाबेगम सलीम फारुकी यांच्या निधनामुळे त्या प्रभागातील निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे.