दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्य टोळी जेरबंद : बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई:

भुसावळ प्रतिनिधि शहर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवलेल्या विशेष गस्तीच्या वेळी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला. रात्री ११.१० वाजता काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केटजवळील आदर्श पॅकेजिंग दुकानाच्या मागे संशयित हालचाल दिसताच पोलिसांनी वेगाने छापा मारून तीन आरोपींना घटनास्थळीच पकडले, तर उर्वरित पाच साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

पकडलेल्या आरोपींत शुभम दुर्गाप्रसाद ओनकर (२४, पोखरणी, ता. खिडकिया), मृत्युंजय उर्फ भोला संत्येंद्र कवीशेखर (४३, बंगाली कॉलनी, हरदा) आणि राजू उर्फ शिवकुमार माणिक (१९, मंगल बाजार, खिडकिया) यांचा समावेश आहे. पोलिसांना पाहताच तिघेही पळण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

या टोळींकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, १२ इंची चॉपर, मिरची स्प्रे, २० फूट दोरी, तसेच तीन बिना नंबर मोटारसायकली बजाज पल्सर (काळी व राखाडी) आणि अपाची झ (लाल)असे जवळपास १.५० लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. दोन मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, भुसावळमधील बंटी परशुराम पथरोड, शिव पथरोड, अभिषेक जवाहरलाल गौर आणि तेजस चंद्रकांत टकले यांनी त्यांना शहरातील सराफ बाजारातील दुकाने आणि धनाढ्य नागरिकांच्या बंगल्यांवर दरोडा टाकण्यासाठी बोलावले होते. स्थानिक साथीदारांनी ‘टार्गेट’ दाखवून बुधवारी रात्री दरोड्यासाठी योग्य वेळ असल्याचे कळवले होते.

फरार साथीदारांमध्ये मयूर टाक, आशिष चोटी, विरेंद्र कडोले उर्फ भय्यू येडा, हनी ठाकुर आणि एक अज्ञात आरोपी यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध पो.हे.कॉ. विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव व त्यांच्या पथकाने केली.