भुसावळ, दि. २७ नोव्हेंबर – भुसावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या स्वतंत्र भारत परिवार या सामाजिक संघटनेने आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेने शहरातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून शहराच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

संघटनेचे रितेश जैन, मुन्ना ठाकूर, चंद्रशेखर पाटील, उमेश पाटील, कैलास चव्हाण व दिनेश दोधानी यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये संघटनेच्या सुमारे साडेपाचशे सदस्यांनी मतदार जागृतीचे व्यापक उपक्रम राबवून हजारो नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त केल्याची आठवण करून दिली.
या वेळी संघटनेने भुसावळ शहराच्या विकासासाठी २४ मागण्या जाहीर केल्या. त्यातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- भुसावळकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याची तातडीची व्यवस्था
- ठेकेदारांची माहिती सार्वजनिक करून दर्जेदार रस्ते व बांधकामे
- एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग प्रकल्प आणण्याचा प्रयत्न
- गुरांसाठी गोशाळांना जागा उपलब्ध करणे
- अवैध कत्तलखाने व उघड्यावरची मास विक्री बंद करणे
- भुसावळ जिल्हा निर्मितीचा पाठपुरावा
- शहराचा नियोजनबद्ध विकास आराखडा
- शिक्षण, शेती आणि उद्योग क्षेत्रात संधी वाढवून होणारे स्थलांतर रोखणे
- गुन्हेगारी निर्मूलनासाठी प्रभावी उपाय योजना
- भटके कुत्रे व भटके जनावरांचा बंदोबस्त
- तापी नदी पुलावर आत्महत्यांवर प्रतिबंधासाठी सुरक्षा जाळी
- नाहाटा चौफुलीवरील जुन्या पाण्याच्या टाकीचे विस्थापन
- आधुनिक नगरपालिकेची इमारत, अॅम्बुलन्स व शववाहिनी उपलब्धता
- वृक्ष लागवड आणि संवर्धन
- संभाजी महाराज स्मारकाचा वेगाने पूर्ण होणारा प्रकल्प
- वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती
- अभ्यासिका, सेमी इंग्लिश शाळा, आयटीआयचे प्रस्ताव
- संपूर्ण शहरासाठी एसटीपी प्रकल्प
- फळ बाजार, खाऊ गल्ली, नॉन-व्हेज मार्केट अशा नियोजित बाजारपेठा
- तापी नदी घाटाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास
संघटनेने या सर्व मागण्या पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्यासाठी निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
स्वतंत्र भारत परिवाराने या उपक्रमांद्वारे भुसावळच्या विकासासाठी पुढील काळात सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.


