भुसावळ पालिकेत महायुती हाेण्याची शक्यता ‘फिफ्टी-फिफ्टी’ ; नेत्यांची देहबाेली, हालचाली देताहेत ‘एकला चालाे रे’चा संदेश : भाजपत इच्छुकांची जत्रा

भुसावळ (उज्वला बागुल ) : जळगाव जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या भुसावळ पालिकेची निवडणूक यंदा ‘न भूताे न भविष्यती’ अशी हाेण्याचे संकेत मिळताहेत. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे ट्रीपल इंजिन असलेल्या महायुतीचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकाही महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा सूर वरिष्ठ स्तरावर निघताे आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अजुनही तसे चित्र समाेर येत नाही. सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याच्या अनुषंगाने माेर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपत तर इच्छुकांची जत्रा भरली आहे. प्रत्येक वाॅर्डात आठ ते दहा जण या पक्षात इच्छूक आहेत. त्यात जुने आणि नवे असे दाेन सुप्त गट आहेत. फरक इतकाच की त्याची जाहीर वाच्यता अजून झालेली नाही. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी ही गटबाजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नेतृत्वाची कसाेटी लागणार
खरं सांगायचं झालं तर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संताेष चाैधरी, विद्यमान मंत्री संजय सावकारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या नेतृत्वाची कसाेटी लागणार आहे. शिवसेनेचा शिंदे गट इथे अपवाद वगळता प्रभावी नाही. अलिकडेच माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी शिंदेसेनेचा तंबू निवडला असला तरी त्यांचा प्रभाव विशिष्ट अशा प्रभागापुरता मर्यादीत आहे.मत विभागणीचा फायदा घेण्यासाठी एमआयएम किंवा स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून मुस्लीमबहूल भागातील नेते आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता बळावली आहे. शिवसेना ठाकरे गटाची अवस्थाही इथे अतिशय बिकट आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध पक्षविरहीत आघाडीही रिंगणात उतरून मंत्री संजय सावकारेना शह देतील असा तर्क जाणकार लढवताहेत.

भाजपत ‘एक घर एक पद’चा अघाेषित नारा
तळागाळातील कार्यकर्त्याना राजकारणात संधी मिळावी म्हणून जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांकडून ‘एक घर एक पद’ असा अघाेषित नारा दिला जाताे आहे. तसा मेसेज पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यत पाेहाेचवण्यासाठी तशी यंत्रणाही कामाला लागली आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला राखीव असल्याने या पदासाठी भाजपतर्फे कुणाचे नाव उमेदवार म्हणून जाहीर हाेते याची उत्सुकता आहे. तूर्त तरी मंत्री संजय सावकारे यांच्या साैभाग्यवती रजनी सावकारे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या पाठाेपाठ संघ परिवाराशी निगडीत असलेली आणखी तीन ते चार नावे आहेत. रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या पत्नी लक्ष्मी मकासरे यांनीही तयारी सुरू केली आहे. रिपाइं सध्या राज्यात व केंद्रात भाजपसाेबत आहे. त्यामुळे भाजपने ही जागा रिपाइंला साेडावी यासाठी मकासरे यांच्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना आपल्याला संधी मिळाली नाही. किमान आता नगराध्यक्षपदासाठी तरी संधी द्यावी अशी गळ त्यांच्याकडून घातली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसेंकडे लागले लक्ष
भुसावळ पालिकेची निवडणूक नेहमीच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अवतीभवती फिरत असते. त्यांच्यामुळेच इथल्या पालिकेवर सर्वप्रथम भाजप व समविचारी पक्षांचा झेंडा फडकला हाेता. म्हणून त्यांची भूमिका या निवडणुकीत अधिक माेलाची ठरणार आहे. महाविकास आघाडी झालीच आणि त्यांनी स्वत: उमेदवार जाहीर करून निवडणूक अंगावर घेतली तर मात्र, भाजप किंवा महायुतीच्या नाकीनऊ येऊ शकते असे प्राथमिक चित्र आहे. या अनुषंगाने त्यांच्या समर्थकांच्या बैठकाही गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. नेहमी आक्रमक भूमिका घेऊन सर्वात आधी उमेदवार जाहीर करणारे माजी आमदार संताेष चाैधरी यांनीही या वेळी संयम पाळला आहे. ‘ताकही ते फुंकून पिताहेत’ कारण गत काळातील अनुभवातून ते शहाणे झालेले असावे असा त्याचा अर्थ काढता येईल.

नगराध्यक्ष पदासाठी चर्चेतील सहा नावे
मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे प्रमोद सावकारे यांच्या पत्नी पल्लवी सावकारे , रश्मी फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता भामरे, डाॅ. मधू मानवतकर, पंचायत समितीच्या माजी सदस्या पुष्पा जगन साेनवणे, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती जंगले, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या पत्नी लक्ष्मी मकासरे यांची नावे सध्या नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. ऐनवेळी आणखी काही आठ ते दहा नावांची भर पडू शकते. किंहबुना, प्रस्थापित चेहऱ्यांवर फुली पडून नवीन चेहरेही पुढे येऊ शकतात.