सरदार वल्लभभाई पटेलांचे आदर्श आणि समाजाची नवी दिशा”

प्रासंगिक लेख – आरती सारंग चौधरी

भारताच्या इतिहासातील “लोहपुरुष ” म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ एक नेते नव्हते, तर राष्ट्राच्या एकतेचे शिल्पकार होते. त्यांनी संपूर्ण देशाला एकत्र बांधण्याचे कार्य केवळ राजकीय दृष्टीने नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही केले. त्यांच्या जीवनाचा पाया होता — एकता, प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव. सरदार पटेल म्हणायचे, “देशाच्या एकतेपेक्षा मोठे काहीही नाही.”
लेवापाटील समाजाने त्यांच्या या विचारांचा वारसा आपल्या जीवनात जपला आहे. कष्ट, शिक्षण, निष्ठा आणि समाजभावना ही पटेलांनी दिलेली मूल्ये आजही या समाजाच्या कार्यात दिसतात. शेतात घाम गाळणारा शेतकरी असो किंवा शिक्षण, उद्योग, प्रशासन क्षेत्रातील यशस्वी तरुण — प्रत्येकामध्ये सरदारांच्या परिश्रमाची आणि जिद्दीची झलक दिसते.
फक्त ३१ आँक्टोबरला त्यांचे स्मरण न करता कायमच समाजाने अधिक संघटित होऊन शिक्षण, रोजगार आणि सामाजिक बांधिलकी यावर भर द्यावा, हीच सरदार पटेलांच्या विचारांची खरी जपणूक ठरेल . सरदार वल्लभभाई पटेलांनी जसे देशाला एकतेच्या सूत्रात बांधले, तसेच लेवापाटील समाजाने परस्परांमध्ये एकोपा, विश्वास आणि सहयोग वाढवून समाजाच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहावा. त्यांच्या आदर्शांचा प्रकाशच आजच्या पिढीला नवी दिशा आणि प्रेरणा देऊ शकतो.
एकता, परिश्रम आणि स्वाभिमान — हेच सरदार पटेलांचे विचार आणि लेवापाटील समाजाची खरी ओळख आहे.
– आरती सारंग चौधरी
संचालिका, मुख्य शाखा
भोरगाव लेवा पंचायत.