पवईतील ओलीस नाट्य संपलं ; आरोपी रोहित आर्या एन्काउंटरमध्ये ठार पोलिसांनी बाथरूममार्गे आत घुसून केली १७ मुलांची सुटका :


मुंबई – मुंबईतील पवई परिसरात गुरुवारी घडलेल्या थरारक ओलीसनाट्याची अखेर पोलिसांच्या धाडसी कारवाईत झाली. पवई येथील आरए स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचा एन्काऊंटर करण्यात आला असून, सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्य हा यूट्यूब चॅनेल चालवणारा आणि छोट्या कलाकारांना ऑडिशनसाठी बोलावणारा होता. गेल्या काही दिवसांपासून तो पवईतील आरए स्टुडिओमध्ये मुलांचे ऑडिशन घेत होता. गुरुवारी दुपारी अचानक त्याने १७ मुलांना आत डांबून ठेवले आणि बाहेर जाण्यास मनाई केली. मुले नेहमीप्रमाणे जेवणाच्या वेळी बाहेर आली नाहीत, त्यामुळे पालकांना संशय आला. दरम्यान, रोहित आर्यने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मुलांना ओलीस ठेवल्याचा दावा केला, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पवई पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि स्टुडिओला चारही बाजूंनी वेढा घातला. पोलिसांनी आधी संवादाद्वारे आरोपीला शरण येण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याने नकार देत पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी एक राउंड फायर केले. या गोळीबारात आरोपी रोहित आर्य गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी स्टुडिओच्या मागील बाजूला असलेल्या बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून मुलांची सुटका केली. सुदैवाने सर्व मुले सुरक्षित असून, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

या संपूर्ण घटनेनंतर सायबर पोलिस आणि क्राइम ब्रँचचे पथक तपासात सामील झाले असून, रोहित आर्यच्या या कृत्यामागील हेतू, त्याचे मानसिक स्थिती आणि डिजिटल नेटवर्क याबाबत तपास सुरू आहे. या थरारक घटनेने पुन्हा एकदा मुंबईच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि सायबर जगतातील धोक्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे
रोहित आर्य हा मुंबई पवई परिसरात एक्टींग क्लासेस आणि ऑडिशनसंदर्भातील काम करतो. सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्म मेकर आणि मोटीव्हेशन स्पीकर अशी सांगतो. ‘अप्सरा’ नावाने त्याचे युट्यूब चॅनेल आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असून आपल्यावर सरकारकडून अन्याय होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे

रोहितचे एका प्रोजेक्टमध्ये गुंतले पैसे
रोहित आर्य मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, सरकारकडे त्याचे पैसे आहेत, त्याने लोन काढून शिक्षण विभागासाठी एक प्रोजेक्ट केला होता. स्वच्छता मॉनिटरसंदर्भातील या प्रोजेक्टसाठी त्याचे पैसे लागले असून सरकारने त्याचे पैसे न दिल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.