भुसावळ (प्रतिनिधी ) – नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका अशी भुसावळची ओळख आहे. इथल्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात असाव्या जिल्ह्याचे नेतृत्व करणारे पुढारी ‘खास’ लक्ष ठेवून असतात. अनेक दशकांच्या कालखंडानंतर इथलं नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महिला राखीव निघालं आहे. पालिकेवर गतकाळात भाजपची सत्ता होती. इथले आमदारही भाजपचे आहेत. त्यामुळे यावेळी भाजपत ईच्छूकांची संख्या मोठी आहे. तुर्त भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचे नाव पुढे आले आहे. मात्र ऐनवेळी पक्षश्रेष्ठी पडतीच्या काळात पक्षाबरोबर राहून संघटना वाढीसाठी धडपड करणाऱ्या संघटनेतील नवीन चेहरा नगराध्यक्ष पदासाठी पुढे आणू शकतात. तो चेहरा जुना जाणता व संघ परिवारातील असणे शक्य आहे. दरम्यान, सध्या तरी भुसावळ नगराध्यक्ष पदासाठी चार नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. त्यात रश्मी फाउंडेशन अध्यक्षा संगीता भामरे, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे, स्वाती जंगले, आंबेडकरी चळवळीतील विद्रोही नेत्या पुष्पा जगन सोनवणे यांचा समावेश आहे.

संगिता भामरेंची जोरदार तयारी
भुसावळ येथील रश्मी फाउंडेशन अध्यक्षा संगीता भामरे यांनीही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्या मध्य रेल्वेत स्टेशन मास्तर असलेले भामरे यांच्या पत्नी आहेत. समाजसेवेच्या माध्यमातून संगीता भामरे यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. त्या कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, त्या सध्या मुंबईत एका सत्ताधारी घटक पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार लाॅबिंग करीत आहेत. तसे झाले तर त्या प्रस्थापित भल्याभल्यांना घाम फोडू शकतात.
संगिता भामरे सेवाकार्यात पुढे
भामरे यांनी कुठलाही राजकीय वारसा नसताना आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या चार वर्षांत अनेक वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. पण त्याचे जाहीर नगारे वाजवलेले नाही. पगारी ढोल बडवलेले नाहीत. इतकेच नव्हे तर प्रसिद्धीचा हव्यास त्यांना नाही. अडचणीत असलेल्या महिलांना शक्य असेल ती मदत करणे, समाजातील महिलांना एकत्र करून जागृती करणे या विषयावर त्या भर देताहेत. म्हणून त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी अशी गळ लोकांकडून घातली जाते आहे.


