विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला ;रोख रखमेसह सोनेचांदी दागिन्यांसह साडेपाच लाखाची घरफोडी ; भुसावळातील चमेलीनगर येथील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीच्या गजबजलेल्या रात्री शहरातील चमेली नगर, वांजोळा रोड येथील व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी हात साफ करत तब्बल ₹५ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची सनसनाटी घटना समोर आली आहे.
मिरवणुकीच्या वेळी कुटुंब घराबाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे.
या प्रकरणी सचिन अनिल चौधरी (वय ३८) यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

चौधरी यांचे दोन मजली घर चमेली नगरात असून, कुटुंबीयांसह ते दुर्गामाता विसर्जन पाहण्यासाठी ३ ऑक्टोबर रोजी रात्री साने गुरुजी चौकात गेले होते. रात्री मिरवणूक संपल्यानंतर ते पहाटे साडेबारा वाजता घरी परतले असता पोर्चमध्ये काच फुटलेल्या व मुख्य दरवाजाची कडी कापलेली दिसली. आत जाऊन पाहिले असता वरच्या मजल्यावरील हॉलचा काचेचा दरवाजा फोडलेला होता. हॉलमधील दोन्ही लोखंडी कपाटे उघडी असून आत ठेवलेले रोख पैसे व दागिने गायब होते.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये –
₹३,३०,००० रोख रक्कम ₹१,६०,००० किंमतीची सोन्याची पोत (४० ग्रॅम) ₹१२,००० किंमतीची सोन्याची कानातली (३ ग्रॅम) ₹१२,००० किंमतीची साधी सोन्याची पोत (३ ग्रॅम) ₹८,००० किंमतीची डोरले सोन्याची कानातली (२ ग्रॅम) , ₹५,००० किंमतीची दोन चांदीची ब्रेसलेट्स (१०० ग्रॅम) ₹५,००० किंमतीची चांदीची पैजने (१०० ग्रॅम) अशा प्रकारे एकूण ₹५.३२ लाखांचा ऐवज घरफोडीतून लंपास झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच बाजारपेठ पोलीस स्थानकाचे विजय नेरकर व सचिन चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

याशिवाय ठसेतज्ञ पथक व फॉरेन्सिक एक्स्पर्ट टीमने घटनास्थळाचा महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह गुप्त माहितीदारांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे.

या चोरीमुळे चमेली नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सणासुदीच्या काळात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिल्याचे सांगितले जाते. सण उत्सवाचे काळात नागरिकांनी आपली घरे बंद करताना योग्य त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.