नऊ कन्यांचा नवरात्राेत्सवाच्या सांगतेला बडबडगीते, बालसाहित्य देऊन सन्मान ; भुसावळच्या इंद्रप्रस्थनगरात राबवला अभिनव उपक्रम ;

भुसावळ |(प्रतिनिधी ) – नवरात्राेत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात नऊ कन्यांचा बडबडगीते, बालगाणी, बालकथा असे विविध प्रकारचे बालसाहित्य देऊन गाैरव करण्यात आला. इंद्रप्रस्थनगरातील इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमध्ये हा कार्यक्रम झाला. चाळीसगावचे कवी मनाेहर आंधळे यांनी ऑनलाइन कविता सादर केल्या. त्यात त्यांनी स्वलिखित व गाजलेली ‘लेक’ कविता सादर केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला चार ते बारा वर्ष वयाेगटातील नऊ मुलींचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांना श्रृंगाराच्या साहित्यासह पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या साहित्यात जामनेरचे कवी अशाेक काेळी यांचे ‘वाघूरचं पाणी’, जळगावच्या माया धुप्पड यांचे ‘नाच रे बाळा’, नाशिकेचे राजेंद्र उगले यांचे ‘थांब ना रे ढगाेबा’, भुसावळच्या सीमा भारंबेंचे ‘गुलमाेहर’, संध्या भाेळेंचे ‘जावे गुंफीत अक्षरे’, एरंडाेलचे विलास माेरेेंचे ‘तिसरा डाेळा’, हिंगाेलीचे गणेश आघाव यांचे ‘आवाघवाडीची गाणी’ अशा विविध काव्यसंग्रहांचा समावेश हाेता. त्यानंतर कवी मनाेहर आंधळे यांनी लय, ताल आणि सुरात दाेन कविता सादर केल्या. ‘लेक’ कविता ऐकताना उपस्थित मुलींच्या डाेळ्यात पाणी आले. कवितेच्या ‘अशी आहे माझी लेक, जशी लाखामध्ये ऐक, कधी ढळून ढळेना तिचा सयंम विवेक’ या ओळींना टाळ्यांची दाद मिळाली. ऑनलाइन काव्यमैफीलीनंतर उपस्थित चिमुकल्या मुलींनी भेट मिळालेल्या बालकाव्यसंग्रहातील कविता व चित्र पाहून आनंद व्यक्त केला. वाचनचळवळ समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांवर अधिक भर दिला पाहिजे. भुसावळात राबवण्यात आलेला हा अभिनव उपक्रम आहे. त्यात सातत्य टिकवून ठेवावे, अशी भावना कवी आंधळे यांनी व्यक्त केली.