एकल, समूहनृत्यातून लाेककलांचा जागर, दाेन्ही गटात १०१ स्पर्धकांचा कलाविष्कार ; जय गणेश फाउंडेशनच्या सांस्कृतिक गणेशाेत्सवात रंगली स्पर्धा

भुसावळ (प्रतिनिधी ) -: शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे सुरभीनगरात नवसाचा गणपती सार्वजनिक उत्सवात दरराेज सांस्कृतिक कार्यक्रम हाेत आहेत. त्यात एकल व समूहनृत्य कलाप्रकारात दाेन्ही मिळून १०१ स्पर्धक सहभागी झाले. त्यांनी मराठी, हिंदी, बाेली भाषांतील गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केला. त्यातून लाेककलांचा जागर करण्यात आला. स्पर्धकांनी मुद्रा, पदलालित्य, चेहऱ्यावरील हावभाव, संगीताचा ताल याेग्य समन्वय साधून रसिकांना खिळवून ठेवले.

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते. एकल नृत्यात लहान गटात २७, माेठ्या गटात १४ असे ४१ तर समूह नृत्यात लहान व माेठा गट असे मिळून ६० असे १०११ स्पर्धक सहभागी झाले. गेल्या अठरा वर्षांपासून गणेशाेत्सवात ही स्पर्धा निरंतर घेतली जाते आहे. दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद आहे. स्पर्धेच्या दरम्यान स्पर्धकांसाेबत त्यांच्या पालकांनाही निमंत्रित केले जाते. जेणेकरून आपल्या पाल्याला कलाक्षेत्रात किती रुची आहे याचे आकलन व्हावे हा त्यामगचा उद्देश असताे. यंदा गणेशाेत्सवात आयाेजित सांस्कृतिक कार्यक्रमांना जाे प्रतिसाद लाभला ताे लक्षात घेता आगामी काळात ‘भुसावळ कलामहाेत्सव’ घेण्याचे नियाेजन असल्याचे नेमाडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन साक्षी चाैधरी यांनी केले. फाउंडेशनचे नचिकेत यावलकर, सुजय पाटील, अभिषेक वाणी, तुषार झांबरे यांच्यासह गणेशाेत्सव आयाेजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

भरताट्यम, कथ्थक, लावणीने रंगत
स्पर्धत भरतनाट्यक, कथ्थक, लावणीसह विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. कथ्थक नृत्यातून स्पर्धकांनी हात आणि बाेटांच्या विशिष्ट मुद्रांचा वापर करून अनेक अर्थ व्यक्त केले. आनंद, दु:ख, राग अशा नानाविध भावना या नृत्यातून व्यक्त करण्यात आल्या. बाेलीभाषांतील गाण्यांवरील नृत्यांतून लाेककला संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पावासाचे वातावरण असले तरी स्पर्धक आणि आयाेजकांचा उत्साह अभूतपूर्व असाच हाेता.

विसर्जन मिरवणुकीत लेझिम पथक
नवसाचा गणपतीची विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी १० वाजता सुरभीनगरातून निघणार आहे. ढाेल-ताशे, लेझीम, झांज पथक त्यात असेल. मराठमाेळ्या नृत्यासह पारंपरिक वाद्यांच्या साक्षीने ही मिरवणूक निघणार आहे. त्यात परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरीक, युवक मंडळांचे सदस्य सहभागी हाेतील. मिरवणूक शिस्तबद्ध व नियाेजित वेळेत पूर्ण व्हावी म्हणून स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्री ८ वाजता तापी नदीच्या पात्रावर विसर्जन हाेईल.