भुसावळ (प्रतिनिधी) : जीवन हे सर्वात सुंदर आहे. स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. शिक्षण घेताना नेहमी संगत चांगली ठेवा. ऊर्जास्थळे शोधून आनंदी जगा. आई-वडीलांच्या पायावर रोज नतमस्तक झाले तर आयुष्याचं कल्याण होईल, असा सल्ला नाशिकचे कवी व नाट्य कलावंत राजेंद्र उगले यांनी विद्यार्थ्यांना दिला.

भुसावळात जय गणेश फाउंडेशनने स्वर्गीय द्वारकाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती द्वारकाई व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यात ‘मुक्काम पोस्ट आनंदनगर’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना कवी उगले बोलत होते. अध्यक्षस्थानी आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन व्ही. एम. महाजन होते. प्रमुख पाहुणे सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव बी. जी. सरोदे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याध्यापक नवल महाजन हे होते. माजी नगराध्यक्ष व फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे यांनी उपक्रमाचा उद्देश मांडला. व्यासपीठावर फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे यांचीही उपस्थिती होती. राजकीय पटलावर काम करीत असताना सलग अकरा वर्षे वैचारिक उपक्रम सुरू ठेवणं सोपी गोष्ट नाही. खरे तर त्यासाठी धाडस लागते. ते उमेश नेमाडे व त्यांच्या टिममध्ये आहे. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम भुसावळचं भूषण आहे असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी काढले. सूत्रसंचालन कलाप्रेमी शिक्षक मनीष गुरचळ यांनी केले. विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
समाज माध्यमे जपून वापरा
शिक्षण घेऊन समाजोन्नती करा. समाजाध्यमांचा जपून वापर करा. त्यांच्या आहारी जाऊ नका. आई-वडीलांत देव शोधा. हे सांगताना कवी उगले यांनी राजेश्वर शेळके यांची ‘शाळेमध्ये आले आता बुट आणि टाय, मला बी आणशील का बाजारातून माय’ ही कविता लयबध्द सादर केली. किंचित यशाने हुरळून जाऊ नका. मैत्री अशी करा की तुम्हाला मिळालेल्या यशाचा आनंद त्याला झाला पाहिजे. संगत चुकली की आयुष्य चुकते हे लक्षात ठेवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कविता ऐकताना हुंदका दाटला
कविता थेट काळजाला भिडणारे प्रभावी माध्यम आहे. हे लक्षात घेऊन कवी उगलेंनी स्वलिखीत ‘नाही गेलो पंढरीला नाही गायिला अभंग, बापामधीच शोधला पंढरीचा पांडुरंग’ ही कविता सादर केली. त्यातून आई-वडीलांची सेवा करा. त्यांच्या कष्टाचे मोल जपा असा संदेश दिला. त्यानंतर त्यांनी ‘बाप सोडून जाताना सुन्या झाल्या दाही दिशा, झाला पोरका भूगोल आणि फाटला नकाशा’ ही कविता सादर केली. ती ऐकताना विद्यार्थ्यांचा हुंदका दाटून आला.
कविता काळजाला भिडणारे माध्यम
विज्ञान व तंत्रज्ञान प्रगत झाले हे मान्य. त्याचा वापर करताना मात्र आपली भाषा, संस्कृती हरवणार नाही याची काळजी घ्यावी. कृत्रिम बुद्धिमत्ता बेभरवशाची आहे हे विसरू नका. आयुष्यात कविता लेखन, गायन, वाचनाचा छंद जोपासा. आईची थोरवी लक्षात ठेवा. हे सांगताना कवी उगले यांनी संग्रहीत असलेली ‘आई तुझी आठवण मी पुरता गहिवरतो, निघून गेली गाय आता गोठा हंबरतो’ ही कविता सादर केली. पूर्वी खतांच्या गोण्यांचे शिवलेले दप्तर व खापराची पाटी असायची. त्यावर खडूने अक्षरे गिरवण्याचा जो आनंद होता तो आता संगणक व तत्सम साधनांनी हिरावून नेला असेही ते म्हणाले.


