खान्देश एक्सप्रेसमधील आग प्रकरणानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; जर्जर कोच तातडीने बदलण्याची मागणी

भुसावळ/दोंडाईचा (प्रतिनिधी) : दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेसमध्ये ३ जूनच्या मध्यरात्री वातानुकूलित (एसी) यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे आग लागल्याची घटना घडल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर रेल्वेच्या देखभाल व तांत्रिक तपासणी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून, गाडीतील जुने व जर्जर कोच तातडीने बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

घटना घडली त्यावेळी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री यांच्यासह अनेक प्रवासी गाडीत प्रवास करत होते. महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांचा यात समावेश होता. आग लागल्यामुळे काही काळ गाडीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दोंडाईचा रेल्वे स्थानकाचे मुख्य स्टेशन अधीक्षक विक्रमसिंह चौधरी यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रविण महाजन यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार वातानुकूलित कोचमधील तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असावी. तसेच देखभाल व दुरुस्ती प्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

खान्देश एक्सप्रेसमध्ये सध्या वापरले जाणारे अनेक कोच जुने झाले असून, ताप्ती विभागातील गाड्यांमध्ये इतर विभागांच्या तुलनेत अधिक जर्जर डबे जोडले जात असल्याबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

निवेदनाद्वारे खान्देश एक्सप्रेसमधील सर्व जर्जर कोच तात्काळ बदलून आधुनिक व सुरक्षित डबे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच वातानुकूलित यंत्रणा आणि इतर तांत्रिक बाबींची उच्चस्तरीय चौकशी, ताप्ती विभागातील सर्व गाड्यांचे विशेष सुरक्षा ऑडिट आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा प्रवासी व रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.