जळगाव (प्रतिनिधी ) गोलाणी मार्केटमधील ज्वेलरी दुकानातून ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे १४३.८६० ग्रॅम सोने घेऊन दोन कारागीर पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय शंकर सातरा (रा. घोरादहा धन्याघोरी, जि. हुबळी, पश्चिम बंगाल) आणि मुस्तफा अली (रा. बागनान, जि. हावडा, पश्चिम बंगाल) या दोन कारागिरांनी हा विश्वासघात केला. विशेष म्हणजे, हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून दुकानात काम करत होते. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १५ एप्रिल २०२५ रोजी अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पटेल नगर येथील रहिवासी श्यामसुंदर अंबालाल सोनी यांचे गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर सोने आणि चांदीचे दागिने बनवण्याचे दुकान आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडून दागिने तयार करण्यासाठी ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे १४३.८६० ग्रॅम सोने त्यांच्याकडे आले होते. हे सोने त्यांनी आपले विश्वासू कारागीर संजय सातरा आणि मुस्तफा अली यांना दागिने बनवण्यासाठी दिले.
मात्र, दुसऱ्या दिवशी सोनी दुकानावर गेले असता, दोन्ही कारागीर गायब असल्याचे आढळले. इतर कारागिरांकडे विचारणा केली असता, त्यांनी रात्री सर्वजण झोपले असताना दोघेही निघून गेल्याचे सांगितले. सोनी यांनी दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी “महत्त्वाच्या कामानिमित्त निघालो आहोत, ८ ते १० दिवसांत सोने परत करू,” असे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर दोघांचेही मोबाइल बंद येऊ लागले, त्यामुळे सोनी यांना अपहाराची शंका आली.
या घटनेनंतर श्यामसुंदर सोनी यांनी १५ एप्रिल २०२५ रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे संजय शंकर सातरा आणि मुस्तफा अली यांच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
१५ वर्षांहून अधिक काळ विश्वासाने काम करणाऱ्या कारागिरांनी असा विश्वासघात करणे ही घटना जळगावातील ज्वेलरी व्यवसायात खळबळ उडवणारी ठरली आहे. या प्रकरणाने दुकान मालकांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांच्या तपासातून आरोपींचा ठावठिकाणा आणि सोन्याचा सुगावा लागण्याची अपेक्षा आहे.


