भुसावळात अभियंत्यांच्या अंगावर दूषित पाणी टाकून नागरिकांचे आंदोलन -हतनूर धरणाचे आवर्तन पोहोचल्यानंतरही नागरिकांना अशुद्ध पाणी

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील दक्षिण भागाला पाणीपुरवठा करताना अन्याय केला जात असल्याच्या निषेधार्थ तसेच अत्यंत दूषित व गाळमिश्रीत पाणीपुरवठ्यानंतर संतप्त नागरिकांनी मंगळवारी दुपारी 12 वाजता पालिका गाठत पाणीपुरवठा अभियंत्यांना धारेवर धरले. यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकार्‍यांच्या अंगावर दूषित पाणी ओतून आपला संताप व्यक्त केला. माजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी ठाकूर यांना ताब्यात घेतले मात्र पालिकेच्या जवाबदार अधिकार्‍यांनी तक्रार न दिल्याने त्यांची सुटका करण्यात आली.

पाणीपुरवठ्यात दुजाभाव : गाळ मिश्रीत पाण्याने नागरिक संतप्त
शहरातील दक्षिण भागातील दिनदयाल नगर व परिसरात गेल्या 12 ते 13 दिवसांपासून पाणी न आल्याने व झालेला पाणीपुरवठा अत्यंत अशुध्द व गाळमिश्रीत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या संतापाचा पारा वाढला. माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात मंगळवारी प्रभागातील नागरिकांनी पालिकेच्या आवारात ठिय्या मांडला. यावेळी नागरिकांनी मुख्याधिकारी राजेंद्र फातले, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दीपक चौधरी, सतीश देशमुख यांना जाब विचारला. अधिकार्‍यांनी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र संतप्त नागरिकांनी मातीच्या मडक्यात आणलेले गाळमिश्रीत पाणी पालिका अधिकार्‍यांच्या अंगावर टाकत संताप व्यक्त केला. माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांना ताब्यात घेण्यात आले मात्र तक्रार न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

अधिकारी नियोजनात फेल : पिंटू ठाकूर
पाणीपुरवठा विभागातील दोन्ही अभियंते अप-डाऊन करतात, मुख्यालयी थांबत नाही व हे अधिकारी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात फेल ठरले आहेत, असे माजी नगरसेवक पिंटू ठाकूर म्हणाले. शहरात वारंवार पाईप लाईन लिकेज होणे, दूषित व अशुद्ध पाणीपुरवठा होण्याचे प्रकार वाढले आहे. दक्षिण व उत्तर बाजूला सारख्याच अंतराने पाणीपुरवठा करावा व नागरिकांच्या प्रश्नांसाठी गुन्हा दाखल झालातरी पर्वा नाही, अशी भूमिका माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी मांडली.