भालोद (प्रतिनिधी ) – “मध्ययुगीन कालखंडात निर्माण झालेल्या विविध भक्ती संप्रदायाचे स्थान महाराष्ट्रातील समाज जीवनात अतिशय महत्त्वाचे ठरलेले आहे. समाजप्रबोधन व उद्बोधन या हेतूने निर्माण झालेले हे भक्ती संप्रदाय असून यातील वारकरी संप्रदाय महत्त्वाचा ठरलेला आहे. महाराष्ट्रातील समाजाला अज्ञान अंधकार व कर्मकांड यातून बाहेर काढून समाजाला मानवता, सदविचार यांची शिकवण देणारा, समाजात अध्यात्मिक लोकशाहीची निर्मिती करणारा आहे. वारकरी संप्रदाय खानदेशातही महत्त्वाचा ठरलेला आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, पायी वारी या माध्यमातून सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येतात व सर्वधर्म समभाव वृत्ती निर्माण होते.अर्थातच एकतेचे प्रतीक असणारा वारकरी संप्रदायाचे विचार व संतांचे विचार डॉ.दिनेश पाटील लिखित खानदेशातील वारकरी संप्रदाय तसेच संत साहित्य आणि संशोधन या ग्रंथातून आलेले आहेत.हे ग्रंथ विद्यार्थी, संशोधक यांच्यासाठी मोलाचे ठरतील.” भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे मराठी विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवाबोली संवर्धन व संशोधन केंद्र यांच्या वतीने प्रा. डॉ. दिनेश पाटील यांचे खान्देशातील वारकरी संप्रदाय तसेच संत साहित्य आणि संशोधन अशा दोन ग्रंथांचे प्रकाशन प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे,फैजपूर येथील ध.ना.महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक डॉ शरद बिऱ्हाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे मराठीतील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. शरद बिऱ्हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. खान्देशला संत साहित्याचा, वारकरी चळवळीचा आध्यात्मिक लोकशाहीचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. डॉ. दिनेश पाटील यांनी आपल्या या ग्रंथांच्या माध्यमातून खानदेशातील वारकरी संप्रदायाची चळवळ व संतसाहित्य यांचे समाज घडणीतील योगदान यासंदर्भात मौलिक असे विचार मांडलेले आहेत.समाजातील दुर्गुण, दुराचार ,कर्मकांड यांचा निषेध करून मानवतावादी मुल्यांची रुजवण संतसाहित्याने केली आहे.” पुढील पिढ्यांसाठी हे दोघं ग्रंथ मोलाचे ठरणार आहेत”. सदर कार्यक्रमाचे आयोजन,प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. जतीन मेढे यांनी केले. प्रकाशन समारंभास उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, प्रा.राकेश चौधरी,डॉ. अजय कोल्हे, डॉ. सुनील नेवे,डॉ. दिगंबर खोब्रागडे, प्रा.सी.व्ही.वानखेडे, प्रा.भावना प्रजापती, पंकज नेहेते,मुबारक तडवी, तुळशीराम पाटील आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



