भुसावळ :भुसावळ शहर आणि परिसरात विविध मस्जिद तसेच प्रमुख ईदगाह मैदानांमध्ये मुस्लिम बांधवांचा ईद-उल-फित्र सण उत्साहात साजरा केला यावेळी विश्वकल्याणासाठी हजारो बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली . सकाळी साडेआठच्या सुमारास ईद-उल-फित्रची नमाज शांततेत आणि भक्तीभावाने अदा करण्यात आली.

शहरातील खडका गावातील नवीन ईदगाह आणि जामनेर रोडवरील जुनी ईदगाह येथे हजारो मुस्लिम समाजबांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली. तसेच, भुसावळ तालुक्यात आणि शहरातील सर्वच मस्जिदमध्ये सकाळी ९ वाजेच्या सुमारास नमाज अदा करण्यात आली.

या प्रसंगी भुसावळ शहर व तालुक्यातील खडका गाव येथील जुनी व नवीन ईदगाह येथे सुमारे २४ ते २५ हजार मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन ईदगाह येथे जाम मोहल्यातील सुन्नी जाम मस्जिदचे पेश इमाम रेहान रजा यांनी नमाज पठण करवले, तर जुनी ईदगाह येथे अमरदीप चौक येथील कंजूल-ए-इमानचे पेश इमाम जुल्फिककार आलम यांनी नमाज पठण करवले. नमाजनंतर कुदबा पठण करण्यात आले आणि दोन्ही इमामांनी विशेष दुवा केली. या दुवेमध्ये मुस्लिम बांधवांच्या सुख-शांतीसाठी तसेच भारताच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी प्रार्थना करण्यात आली.
नमाज पठण सुरळीत पार पडावे म्हणून नगरपालिका प्रशासनाने आवश्यक सुविधा पुरवल्या होत्या. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ईदगाह ट्रस्टने सीसीटीव्ही लावून सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेतली होती. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी फायर ब्रिगेड आणि ॲम्बुलन्सची व्यवस्था देखील ठेवण्यात आली होती.
नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

लहानग्यांनीही आनंदाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुस्लिम समाजबांधव कब्रस्तानात जाऊन आपल्या नातेवाईकांच्या कबरींवर दुवा केली. घरी परतल्यानंतर आई-वडिलांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच पारंपरिक शीरखुर्म्याचा आस्वाद घेतला. तसेच, हिंदू समाजातील बांधवांनाही ईदच्या शुभेच्छा देऊन आपापल्या परी येणे शीरखुर्म्याचा आस्वाद घेतले आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. या ईद-उल-फित्रच्या नमाज साठी ईदगा ट्रस्ट व मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. ईद-उल-फित्रच्या निमित्ताने सामाजिक एकोपा दृढ झाला आणि प्रेम व बंधुत्वाचा संदेश देणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


