अस्थी विसर्जना ऐवजी वृक्ष लागवड करून दिला आदर्श सामाजिक संदेश ;

भुसावळ – अस्थी विसर्जना ऐवजी वृक्ष लागवड करून समाजास एक आदर्श संदेश येथील स्व.दिलीप सावळे यांच्या नातेवाईकांनी दिला . स्व साबळे यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी जलाशयात विसर्जित न करता स्वतःच्या शेतामध्ये, वृक्षराजाच्या सहवासात विसर्जित करून पर्यावरण पूरक निर्णय घेत नातेवाईकांनी एक आदर्श घालून दिला. त्याप्रसंगी बोहर्डी गावाचे सरपंच बबलू सोनवणे, बाळू इंगळे , सागर वानखेडे, चंद्रकांत वाघ , आदी उपस्थित होते
ते कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष डॉ संजय निकम यांचे मामा व सुनील सावळे यांचे भाऊ तसेच आकाश सावळे, प्रेम सागर सावळे, विकास सावळे यांचे वडील स्व. दिलीप सावळे हे बोहर्डी बुद्रुक येथील माजी उपसरपंच,एक सोज्वळ व्यक्तिमत्व. इतरांच्या उपयोगात पडून धन्यता माणणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या या स्वभावालाच अनुसरून नातेवाईकांनी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी विसर्जित करण्याचा एक आदर्श निर्णय घेतला. मृत्यूनंतरही इतरांना वृक्षांच्या सावलीने ते मदत रुपी ठरणार आहे.जलाशयात अस्थी विसर्जित करून जल प्रदूषण घडून येते, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच रूढ परंपरा टाळून एक आदर्श असा निर्णय घेत, अस्थी शेतातच विसर्जित करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर तेथे वृक्ष लागवड सुद्धा करण्यात आली.
अशा आदर्श परंपरांची जोपासना करणे ही आता काळाची गरज बनली आहे. स्व.सावळे यांच्या परिवाराचा हा आदर्श समाजाला चांगला विचार देणारा निश्चित ठरतो आहे. त्यांच्या या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.
परिवाराच्या या निर्णयामुळे स्वर्गीय दिलीप सावळे यांच्या पवित्र आत्म्याला खरी शांतता लाभेल . हीच त्यांना खरी श्रद्धांजली सुद्धा ठरली आहे.