भुसावळात रेकॉर्डवरील संशयीत मुकेश भालेरावची हत्या -आठ दिवसांनी खून उघडकीस : खुनानंतर मध्यरात्री उरकला दफनविधी


भुसावळ-( प्रतिनिधी) – भुसावळातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयीत मुकेश भालेरावची हत्या करून मृतदेह दफन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे
या संदर्भातील वृत्त असे की, मुकेश प्रकाश भालेराव ( वय 31, रा. टेक्नीकल हायस्कूल मागे भुसावळ ) याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबध्द देखील केले होते. यातून बाहेर आल्यानंतर तो भुसावळ येथेच वास्तव्याला होता.

सुमारे चार दिवसांपूव मुकेश भालेराव याला घरून काही तरूण घेऊन गेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेऊन देखील तो मिळून न आल्यामुळे आज सकाळी त्याची पत्नी पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आली. दरम्यान, आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुकेश प्रकाश भालेराव याचा खून करून त्याचा मृतदेह हा तापी नदीच्या बाजूला असलेल्या भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला.

मुकेश भालेराव याचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले असून शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली व खून उघडकीस न येण्यासाठी तापी नदीजवळील निर्जनस्थळी पुरण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

मुकेश प्रकाश भालेराव याची टोळी असून त्यांच्यावर तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याची हत्या ही टोळीयुध्दातून झाल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपासातून यातील सत्य समोर येणार आहे. या खुनामुळे भुसावळात मध्यंतरी बंद झालेले टोळी युध्दाने पुन्हा डोके वर काढले की काय ? असा एकच सूर उमटला होता . पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
मयत मुकेश प्रकाश भालेराव (32, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) विरोधात अनेक गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे तर मध्यंतरी त्यास स्थानबद्धदेखील करण्यात आले शिवाय हद्दपारीची कारवाईदेखील त्याच्यावर करण्यात आली होती.