खासदार संजय राऊतांचा दावा ; औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण उलटल्यानेच दिशा सालियन प्रकरण काढले –

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी दिशा सालियन प्रकरणात मोठा दावा केला आहे. औरंगजेब कबरीचे प्रकरण त्यांनी बाहेर काढले मात्र तेच प्रकरण त्यांच्यावर उलटे शेकले गेले त्यामुळे दिशा सालियन प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीच्या भविष्यावर असा चिखल उडवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

ठाकरे कुटुंबाला आणि संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटले. औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढून आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला मात्र तो त्यांच्यावरच उलटला त्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या काही दिवसापासून शिजवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यामागे कोणाची प्रेरणा आहे? कोणाची शक्ती आहे? आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होते? याची सर्व माहिती आमच्याकडे असल्याचा दावा देखील त्यांनी केला.