धुळे – दुकानाच्या स्थळ परीक्षणासाठी आठ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख (44, फ्लॅट नंबर 202, मोरया हाइट्स, मानराज पार्क स्टॉप, नवजीवन सुपर शॉपिंच्या मागे, द्रोपती नगर, जळगाव) व खाजगी इसम तुषार भिकचंद जैन (36 मराठी गल्ली, शिरपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली होती. लाचखोर देशमुखाच्या जळगावातील घराची स्थानिक एसीबीने झडती घेतल्यानंतर तब्बल 31 लाख 30 हजार शंभर रुपयांची रोकड, 17 लाख 46 हजार 100 रुपयांचे दागिने व 22 हजार 760 रुपये किंमतीचे चांदीने दागिणे जप्त करण्यात आले.
34 वर्षीय तक्रारदाराला शिरपूर येथे पशू पक्षी फार्मचे दुकान सुरू करावयाचे असल्याने त्यांनी दुकानाचा परवाना मिळण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लाचखोर अधिकार्याने आठ हजारांची लाच मागितली व एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी खाजगी पंटर जैन यास पारोळा चौफुलीवर पकडण्यात आले व त्यानंतर अधिकारी देशमुख यासदेखील अटक करण्यात आली.



