भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पू. ओं. वाणिज्य महाविद्यालयात रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमिटी अंतर्गत आयपीआर आणि पेटंट प्रोसेस या विषयावरती व्याख्यान २८ रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील उपस्थित होते. तसेच मंचावर उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डी. एन. पाटील, प्रमुख वक्ते डॉ. उमेश फेगडे, समितीप्रमुख डॉ. सचिन येवले यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते डॉ. उमेश फेगडे यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये कॉपीराईट, ट्रेडमार्क, लोगो, पेटंट यांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अनेक उदाहरणांमधून स्पष्ट केले. एखाद्या आविष्कारांचे अधिकार आपण पेटंट मधून घेतले तर त्याची रॉयल्टी वीस वर्षापर्यंत मिळत असते. तर ट्रेड सीक्रेट हे कायमस्वरूपी असते पण त्याचे जतन करणेच खूप कठीण असते. कॉपीराईटच्या अंतर्गत पुस्तके, संगीत, चित्रे आणि चित्रपट यासारख्या साहित्यिक आणि कलात्मक कार्यांचे अधिकार हे घेता येतात. औद्योगिक डिझाइन, भौगोलिक संकेत, लेआउट डिझाइन, व्यापार रहस्ये : सूत्रे, पाककृती किंवा प्रक्रिया यासारख्या अज्ञात माहितीचे अधिकार, नवीन वनस्पती प्रकार : वनस्पतींच्या नवीन जातींचे अधिकार अशा बऱ्याचशा गोष्टींवरती कॉपीराईट, पेटंट करता येते. यासोबतच डॉ. फेगडे यांनी पेटंट दाखल करण्याची प्रक्रिया सोप्या शब्दात समजून सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोजकुमार जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रश्मी शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ. मनोज जाधव, डॉ. सचिन कोलते यासोबतच प्रा. डॉ. व्ही. एन. महिरे, प्रा. संगीता भिरूड, डॉ. अजय क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले.



