भंडारा : भंडारा जिल्ह्यात या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील चिखली गावात राहणारा अवघ्या चार वर्षाचा नील मनोज चौधरी याच्या शोधात अख्ख भंडारा प्रशासन तब्बल ७२ तास जंगलामध्ये होतं.

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील चिखली हे गाव तसं जंगलाच्या शेजारचं.. अनेकदा हिंस्र प्राण्यांचा गावकऱ्यांना अनुभव आलेला आहे..एक जानेवारी चा दिवस! सकाळच्या वेळी अंगणात खेळत असलेला नील आणि त्याची आई कामासाठी बाहेर गेलेली! संध्याकाळी ज्यावेळेस आई कामावरून आली, तेव्हा दररोज आईच्या साठी बाहेर येणारा नील घराबाहेर दिसला नाही. घरातही दिसला नाही. शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर नीलला दिवसभरात कोणी पाहिले नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली. आई घाबरली. तिच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिने गावकऱ्यांकडे मदत मागितली.
गावातला फक्त चार वर्षाचा चिमुकला गेला म्हणल्यानंतर अख्ख गाव जागं झालं सगळेजण या चिखली गावाच्या जंगलाकडे सरकले सगळेजण शोधू लागले शेजारच्या पोलीस ठाण्यातही त्याची खबर देण्यात आली मग पोलिसांनी चिखली गावाच्या परिसरातील नाकेबंदी केली एवढेच नाही तर लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरही नाकेबंदी केली.

२ जानेवारी असाच गेला.. ३ जानेवारीचाही दिवस गेला.. लोक मात्र थकत नव्हते अखेर वन विभागाने पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने मदत घेतली. या दोन दिवसांमध्ये ड्रोन च्या साह्याने मदत घेऊनही हाती काही पडलं नव्हतं. मात्र अखेर चिखलीच्याच खाणीच्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या डोंगरावर एका झाडाखाली नील ड्रोनला दिसून आला. विशेष म्हणजे धोकादायक ठिकाणी असून सुद्धा नीलला कोणत्याही जखमा किंवा काहीही आढळले नव्हते तो एकदम सुखरूप होता त्याला या ठिकाणी कोणी नेले आणि तीन दिवस तो जंगलात झाडाखाली कसा राहिला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे .
अर्थात पोलिसांसह गावातील नागरिक आणि प्रशासनाने प्रचंड मोहीम राबवल्यामुळे त्याचे अपहरण करणाऱ्या किंवा घातपात करण्याची तयारी करणाऱ्या अज्ञात गुन्हेगाराला भीती वाटून त्यांनी पुन्हा नीलला सुखरूप त्या ठिकाणी आणले का? असा देखील संशय पोलिसांना आहे त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.



