सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते 26 रोजी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण


भुसावळ – मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील गट 167पैकी 51 व काकोडा 167 पैकी 36, 167 पैकी 27 यामधील वर्ग 2चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करतांना पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी मिळून शासनाची फसवणूक केली. याबाबत सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी कारवाईबाबत अप्पर मुख्य सचिव व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडे तक्रर अर्ज दाखल केला होता. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने येत्या दि. 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे.
याबाबत माहिती अशी की, दि.19/4/2024 रोजी अप्पर मुख्य सचिव व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडे पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी यांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे याकरिता तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची दखल घेत विभागीय आयुक्त यांनी क्र.मशा/ कार्य 1/आस्था-2/ ई.नं. 1871729/2024 दि.13/4/2024 या पत्राने चौकशी करून आवश्यकती कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना आपल्या स्तरावरून परस्पर कळविण्यात यावे, अशी विनंती कुंदन हिरे आयुक्त कार्यालय तहसीलदार अस्थापना यांनी जिल्हाधिकारी यांना केली होती. मात्र सदर पत्रानुसार कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.या अर्जावरती व त्यानंतर दि.29/10/2024 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तक्रार अर्ज दाखल केला होता.त्या अर्जावर सुध्दा कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. दि.2/12/2024 लोकशाही दिनी तक्रार अर्ज दाखल केला होता व त्यावरती उत्तर देतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार महसुल ज्योती गुंजाळ यांनी लोकशाही दिन संदर्भात पत्र क्र. जमीन 2/26/नअश/ई-टपाल/2024/33/171571 दि.19/12/2024 यांनी प्रस्तुत प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडिल आदेश क्र.21/2/24 अन्वये समिती गठीत करण्यात आलेली असून सदरील वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरीत आदेशाबाबतची संचिका कामकाज तपासणी समितीमार्फत सुरू आहे.

या आदेशाबाबत संचिका तपासणीचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. समिती अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यातील तरतूदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कळविण्यात आले आहे. सदरील समितीतील अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.सानप यांनी दि.2/1/2025 रोजी अप्पर जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना उपोषणास बसण्याबाबत कळविलेले आहे. त्यानुसार दि.26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामोर उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.