बाभूळगाववासीयांचा थरकाप उडवणार्‍या जळगाव आगारातील मद्यपी चालकाचे अखेर निलंबन –

जळगाव : जळगाव एसटी डेपोतील बाभूळगाव मुक्कामाला निघालेल्या बसवरील मद्यपी चालकाने हेलकावे खात बस चालवल्यानंतर सतर्क प्रवाशांनी वेळीच बस रोखली. विभाग नियंत्रकांनी धाव घेत पर्यायी चालकाची व्यवस्था करत प्रवाशांना आश्वस्त केले तर कर्तव्यात कसूर करीत ड्युटीवर मद्य प्राशन केल्याचे आढळल्याने संबंधित बस चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आनंद माळी असे निलंबित बस चालकाचे नाव आहे.
जळगाव डेपोची बस क्रमांक (एम.एच.14 बी.टी.2304) ही बस बाभूळगाव या गावाला रात्री मुक्कामी जाते. नेहमीप्रमाणे सोमवार, 16 रोजी रात्री बस आपल्या मुक्कामीस्थानी निघाली असता पाळधीचा पुल पार केल्यानंतर बसमधील प्रवाशांच्या लक्षात आले की, बस चालक हा मद्यधूंद आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी एका हॉटेलजवळ बस थांबवत कंडक्टरला याबाबत सांगितले. याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना मिळताच त्यांनी रात्री खाजगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन प्रवाशांशी चर्चा केली व त्यानंतर लगेच संबंधित चालकाचे निलंबन करण्यात आले. प्रवाशांनी वेळीच सतर्कता दाखवली अन्यथा कुर्ला घटनेची पुनरावृत्ती घडली असती !

मद्यपी चालकाचे निलंबन : काळजी घेणार
मद्यधूंद वाहन चालक आनंद माळी यांच्या जागी दुसर्‍या वाहन चालकाची व्यवस्था करून बस मार्गस्थ करण्यात आली असून या चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्य प्राशन केल्याचे आढळल्याने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले. यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.