जळगावात मतदारांच्या सहानुभूतीसाठी अपक्ष उमेदवाराचा घरावर गोळीबार : मालेगावातून दोघांना बेड्या -कटाच्या प्लॅनमध्ये उमेदवार पितासह दोन्ही पुत्र सहभागी

जळगाव : विधानसभा निवडणुकीदरम्यान जळगाव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांच्या घरावर बनावट गोळीबार केला होता. ही फायरिंग करणारे दोन संशयित पसार होते. ते मालेगाव येथे आल्याची माहिती मिळताच एलसीबी पथकाने मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा व त्याचा साथीदार शेख उमर फारुख अहमद हुसने यांना रविवार, 8 रोजी पथकाने ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयाने मंगळवार, 10 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शेरा चौकातील जिदान अपार्टमेंट येथे अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांच्या घरावर 18 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी अहमद शेख यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवार, 5 रोजी एलसीबीच्या पथकाने इरफान अहेमद मोहम्मद हुसेन, दरेगाव ता.मालेगाव याला ताब्यात घेतले चौकशी केली असता त्याने हा गुन्हा अहेमद हुसेन त्याचा शालक व त्याचा मित्र मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा (रा.मालेगाव) याच्या साथीने केल्याची कबुली दिली.
हा प्लॅन सक्सेस करण्यासाठी अहमद हुसेन ततसेच मोहम्मद शफीक बाबा हे दुचाकीने मालेगाव येथून जळगावात आले. त्यानंतर अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांच्या घरावर तीन राऊंड फायर केल्याची कबुली दिली.

फायरिंग करण्याचा कट अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन त्यांचा मुलगा शेख शिबान फाईज अहमद हुसेन , दुसरा मुलगा शेख उमर फारुख अहमद हुसेन, इरफान अहमदन मोहम्मद हुसेन, शरिफ उर्फ बाबा ( दोन्ही रा.मालेगाव) यांनी रचला. त्यानंतर फायरिंग करण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी 5 रोजी शेख अहमद शेख हुसेन (अपक्ष उमेदवार), शिबान फाईज अहमद हुसेन,रा. जळगाव, इरफान अहमद मोहम्मद हुसेन (मालेगाव) यांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, एएसआय विजयसिंग पाटील, एएसआय अतुल वंजारी, हवालदार अक्रम शेख, हरिलाल पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील, चालक भरत पाटील यांच्या पथकाने केली.