भुसावळ – रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना वेळोवेळी तिकीट घेऊन प्रवास करण्याच्या सूचना करण्यात येतात, तरीही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. असे प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या रडारवर असून नोव्हेंबर महिन्यात रेल्वे प्रशासनातर्फे ६५ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तब्बल चार कोटींचा दंड वसूल
करण्यात आला.
एकीकडे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करताना प्रवाशांना सोयीसुविधा
देण्यावर भर आहे.
त्यात मलकापूर आणि शेगाव स्थानकावर लिफ्ट सुरू केली. यामुळे दिव्यांग आणि वृद्ध प्रवाशांची सोय
झाली. जळगाव, भुसावळ, अकोला स्थानकांच्या पार्सल कार्यालयात क्यूआर कोड पेमेंटची सुविधा सुरू केली.
भुसावळ विभागाने केली एकूण १३८ कोटींची कमाई

नोव्हेंबर २०२४ या महिन्यात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने १३८ कोटी ४६ लाखांचा महसूल मिळवला आहे.
यापैकी तिकीट तपासणी पथकाने ६५ हजार प्रवाशांवर कारवाई करून ४ कोटी १८ लाखांचा दंड वसूल केला. भुसावळ विभागाने वित्तीय वर्ष २०२४-२५ मधील नोव्हेंबर महिन्याच्या महसुलात विविध क्षेत्रांत लक्षणीय वाढ साधली प्रवासी उत्पन्नातून ६३ कोटी ४४ लाख, अन्य कोचिंगमधून ८ कोटी ८ लाख रुपये, माल वाहतुकीतून ६५ कोटी २१ लाख रुपये, विविध विभागांतून १ कोटी ७३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.


