रेल्वेच्या ट्रेड युनियनसाठी 11 वर्षानंतर निवडणूक : पहिल्याच दिवशी 47.37 टक्के मतदान -आज व उद्याही होणार मतदान : सर्वच केंद्रावर मतदारांच्या रांगा

भुसावळ – तब्बल 11 वर्षानंतर भारतीय रेल्वेतील ट्रेड युनियनची निवडणूक होत असून पहिल्याच दिवशी मतदानासाठी कर्मचार्‍यांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. बुधवार ते शुक्रवारपर्यंत मतदान सुरू राहणार असून पहिल्या दिवशी 47.37 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. शहरातील 12 तर विभागातील 18 अश्या 30 मतदान केंद्रावर रेल्वे कर्मचार्‍यांनी मतदानाचा हक्क बजावला.

11 वर्षानंतर निवडणूक
भारतीय रेल्वेमध्ये 11 वर्षांनंतर ट्रेड युनियनच्या निवडणुका होत आहे. भुसावळसह विभागात 16 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. बुधवार, 4 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदानासाठी कर्मचार्‍यांनी गर्दी केली. ही प्रक्रिया शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वरिष्ठ कार्मिक अधिकारी एन.एम.काझी होते. भुसावळ येथे डीआरएम कार्यालय,आयओडब्ल्यू, अपसिड साईडींग, (सीएनडब्ल्यू), न्यु. सिडसाईडींग (यार्ड), सीवायएम कार्यालयाच्या परिसरात तीन मतदान केद्रे, पीओएच, एमओएच, वरिष्ठ वित्त विभाग कार्यालय, रेल्वे हॉस्पीटल, रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म चारवरील पॅसेजर लॉबी येथे मतदारांनी दिवसभरात त्यांना मिळालेल्या वेळेनुसार मतदान केले.

या संघटना रणांगणात
उत्तर रेल्वेतर्फे ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे एनआरएमयू, नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेनचे यूआरएमयू, भारतीय रेल मजदूर संघाचे यूआरकेयू, भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाचे एनआरईयू आणि स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी संघ निवडणुकीसाठी पात्र आहे.