त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगिरीवर भुसावळ रनर्सच्या एकताची विजयी पताका : 22 किमी मध्ये विजयी” : रनर्सगृपच्या “एकतेचा ” गौरव :


भुसावळ – रनबडीज संस्थेतर्फे त्रंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर 3 किमी, 5 किमी, 10 किमी, 15 किमी व 22 किमी या श्रेणींमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे 20 धावपटू सहभागी झाले होते. त्यापैकी एकता भगत महिलांच्या गटात 22 किमी अंतरात तृतीय ठरल्या. ज्यावेळी एकता भगत यांचे नाव विजयी म्हणून घोषित करण्यात आले त्यावेळी त्यांनी व्यासपीठावर पोहोचताच आयोजकांना सांगितले, की माझ्यासोबत माझा भुसावळचा रनिंग ग्रुप आला आहे. आयोजकांनी यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात प्रविण पाटील यांना देखील व्यासपीठावर बोलावले व त्यानंतर एकदा भगत यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित सर्व धावपटूंनी एकच जल्लोष केला.

स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे सह इतर राज्यातील देखील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशा सर्व धावपटूंमध्ये भुसावळची धावपटू अव्वल ठरली याबद्दल एकदा भगत यांचे संपूर्ण ग्रुप तर्फे अभिनंदन करण्यात आले.
वैशिष्ट्य म्हणजे सहभागी धावपटूंपैकी पुष्पा व संजय तिवारी तसेच जयश्री व जितेंद्र चौधरी या दांपत्यांनी देखील एकत्र सहभाग नोंदविला.

आदल्या दिवशी रात्रंदिवस सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्व धावपटू चिंतेत होते. मॅरेथॉनच्या दिवशी देखील पहाटेपासूनच पावसास सुरुवात झाली. परंतु अशाही परिस्थितीत धावपटूंनी मोठ्या निर्धाराने धावण्यास सुरुवात केली. पावसामुळे डोंगरावरील सर्वच धबधबे प्रवाहित झाल्यामुळे अतिशय नयनरम्य वातावरण होते. शिवाय ते पाणी रस्त्यांवरून वाहताना सर्व धावपटू पाण्यातूनच मार्गक्रमण करीत होते. ठिकठिकाणी वाहणारे नदी नाले तुडुंब पाण्याने आपल्या आवाजाच्या खळखळाटाने धावपटूंच्या मनात धडकी भरवित होते. शिवाय संपूर्ण ब्रह्मगिरीने हिरव्या रंगाची घनदाट झाडांची शाल पांघरली की काय अशी शंका निर्माण होत होती. परंतु अशाही परिस्थितीत धावपटू त्र्यंबकेश्वराच्या महादेवाची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सातत्याने मार्गक्रमण करीत होते. याशिवाय या प्रदक्षिणा मार्गावरील पायऱ्यांची चढ उतार करताना सर्व धावपटूंची चांगली दमछाक होत होती. परंतु या सर्व अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून जेव्हा धावपटू परतत होते त्यावेळी आयोजकांतर्फे सुंदर पदक प्रत्येक धावपटूस प्रदान केले जात होते. त्यावेळी या प्रतिकूल परिस्थितीत परंतु आनंददाई वातावरणात धावण्याचे चीज झाल्याची कृतार्थ भावना धावपटू अनुभवत होते.

या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सहभागी धावपटू पुढीलप्रमाणे: 22 किमी: एकता भगत, जयश्री चौधरी, जितेंद्र चौधरी, माया पवार, डाॅ रोहित पाटील, श्री हरिराम, निलेश पाटील
15 किमी: डाॅ चारुलता पाटील, स्वाती फालक, डाॅ उमाकांत चौधरी, राकेश चौधरी 10 किमी: पुष्पा तिवारी, ज्योती सिंग, किर्ती मोताळकर,प्रविण पाटील
5 किमी: पुष्पलता चौधरी याशिवाय डॉ निलिमा नेहेते, प्रमोद शुक्ला, सारंग चौधरी, सुनीता रंजन सिंग व सुषमा सिंग हे धावपटू वैयक्तिक कारणांमुळे सहभागी होऊ शकले नाही.